29.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeलातूरदेशात आता परिवर्तनाचे वारे

देशात आता परिवर्तनाचे वारे

लातूर : प्रतिनिधी 
देशातील महिला, युवक, शेतकरी, कामगार कोणीही सुखी, समाधानी नाही. वाढती महागाई, बेरोजगारी, अत्याचार यामुळे देशात सर्वत्र चिंताजनक स्थिती आहे. याला जनता कंटाळली आहे. त्यामुळे देशात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसच्या मागे ताकदीने उभे राहण्याचा, काँग्रेसच्या उमेदवारांना मत देण्याचा ठाम विचार देशातील मतदारांनी केला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते, माजी  मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी येथे केले. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील तांदुळजा (ता. लातूर) येथे लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, डॉ. शिवाजी काळगे, जगदीश बावणे, धनंजय देशमुख, मदन भिसे, सुभाष घोडके, अनुप शेळके याप्रसंगी उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, तांदूळजा व पंचक्रोशीतून काँग्रेस पक्षाला नेहमीच पाठींबा असतो. ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्यापासून लोकनेते विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख यांच्यापर्यंत सर्वांच्या पाठीमागे आपण उभे राहिले आहात. आपण काँग्रेसचा खासदारही निवडून दिला आहात. मात्र, मागील १० वर्षांत आपण भाजपची राजवट अनुभवली आहे. यातून सामान्यांना काय मिळाले? लातूरच्या विकासासाठी त्यांनी काय केले? याचे उत्तर त्यांनी काहीच केले नाही, असे आहे. सोयाबीन व इतर पिकांना भाव नाही. गेल्या १० वर्षांत भाव दुपटीने वाढायला पाहिजे होता; पण उत्पादनखर्च दुपटीने वाढला आहे. शेतीत उत्पन्न तेवढेच आहे; पण शेतीमालाला भाव नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या करतोय. शेती परवडत नाही. अशीच नाराजी युवक, महिला, मजूर, व्यापारी अशा सर्व स्तरांत आहे. त्यामुळे जनतेला आता परिवर्तन हवे आहे. बदल हवा आहे. जनता आता भाजपच्या खोट्या आश्वासनांना, जुमल्यांना बळी पडणार नाही, असे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.
आमदार धिरज देशमुख म्हणाले, संविधानाचे रक्षण करण्याची, लोकशाही जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी ही निवडणुक आहे. देशातील महागाई, बेरोजगारी हटवण्यासाठीची ही निवडणूक आहे. त्यामुळे सर्वांनी गांभीर्याने मतदान करावे. डॉ. शिवाजी काळगे यांना आपण प्रंचड मतांनी निवडून द्यावे. मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यामध्ये लातूरमधील अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी, शेतीमालाला हमीभाव आणि शेतक-यांना कर्जमाफी मिळण्यासाठी, जीएसटी मुक्त शेती करुन सरकारचे जाचक धोरण बदलण्यासाठी आपण डॉ. काळगे यांना आशीर्वाद द्यावा. डॉ. शिवाजी काळगे म्हणाले, केंद्र सरकारच्या विरोधात सर्वत्र वातावरण आहे. काँग्रेस, महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद असाच ठेवून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी.
यावेळी महारुद्र चौंडे, शाहूराज पवार, जयचंद भिसे, किशनराव लोमटे, कैलास पाटील, अरुण कुलकर्णी, वसंत उफाडे, अशोकराव काळे, श्रीमंत गायकवाड, रणजित पाटील, बाबुराव जाधव, बलभीम शिंदे, दत्ता शिंदे, शफी शेख, लक्ष्मण पाटील, अप्पासाहेब हिप्परकर, शिवाजी बावणे, हरीभाऊ गायकवाड, अंगद सूर्यवंशी, बालाजी वाघमारे, गोवर्धन मोरे, व्यंकट पिसाळ, बंकट कदम, गोंिवद बोराडे, भैरवनाथ सव्वासे, साहेबराव पाखरे उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता बनाळे, कमलाकर अनंतवाड यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR