सोलापूर : प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटलांनी अजब वक्तव्य केले आहे. शिवसेनेला मतदान करणारे स्वर्गात जाणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे. ज्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबले त्याला स्वर्गातच जागा आहे, तो नरकात जाणारच नाही अस विधान करत शहाजीबापू पाटलांनी अकलेचे तारे तोडले आहेत.
सांगोल्याच्या सभेत बोलताना बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, मी खात्रीने सांगतो, ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाण दाबला त्यांना त्यांना स्वर्गातच जागा आहे. नरकात तुम्हाला देव घेत नाही. स्वर्गात तुम्ही गेल्याशिवाय राहत नाही. देव तुम्हाला नरकात जाऊच देत नसतो. मात्र, ज्यांनी विरोधकांची बटणं दाबली त्यांचे काय खरे नाही त्यांच्यात रामच उरला नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
तसेच यावेळी बोलताना शहाजीबापू पाटलांनी विधानसभेतल्या पराभवावरून देखील दीपक साळुंखेंवर टीका केली. ते म्हणाले, मी भाकरीत साप पाळला होता म्हणूनच मला विधानसभेला पराभवाचा फटका बसला, असे ते म्हणाले. तसेच आपण आजही महायुतीत आहे. आपल्याला युतीचेच काम करायचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे शहाजीबापू पाटील म्हणाले, हा मतदारसंघ २०१४ पासून शिवसेनेचा आहे. तुम्ही आमचा सन्मान ठेवा आम्ही तुमचा कोणताही शब्द खाली पडू देणार नाही. पण तुम्ही तसे केले नाही, तर आम्ही पुन्हा एकट्या वाटेने जाऊ, असा इशारा त्यांनी यावेळी भाजपला दिला. शिवाय तुम्ही आताच्या निवडणुकीत ऐकले असते तर तुम्ही सत्तेत निम्मे भागीदार झाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.
दीपक साळुंखेंवर टीका
माजी आमदार व शहाजीबापू पाटलांचे कट्टर विरोधक समजले जाणारे दीपक साळुंखे यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, दीपक साळुंखे स्वत:ला किंग मेकर म्हणतात. मी जिथे जाईल त्याचा गुलाल असतो असे ते सांगतात. मात्र, ते पांढ-या पायांचे असल्यामुळे ते ज्यांच्याकडे जातील त्यांचा पराभव नक्की, अशी जहरी टीका पाटलांनी केली.

