37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसंपादकीय विशेषधावांचा वर्षाव चांगला; पण...

धावांचा वर्षाव चांगला; पण…

आयपीएल सामन्यांमधील धावांचा वर्षाव प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ठरत असला तरी क्रिकेट अभ्यासकांसाठी तो विस्मयकारक आहे. त्यामुळे गोलंदाजांची दयनीय अवस्था बदलण्यासाठी अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. आधुनिक दर्जाच्या बॅट आणि आक्रमक खेळी देखील धावसंख्या उभारणीत योगदान देत आहेत. परिणामी, यंदा आयपीएलमध्ये कमी धावसंख्येचे रोमहर्षक सामने कमी झाले आहेत. परंतु विश्वचषकाच्या वेळी अशा प्रकारची खेळपट्टी मिळत नसल्याने तेथे आपल्या फलंदाजांना अडचणी येतात. म्हणून जूनमध्ये होणा-या टी-२० विश्वचषकाच्या अगोदर सर्व उणिवा दूर करणे गरजेचे आहे.

आयपीएल २०२४ चा हंगाम हा फलंदाजांच्या वरचष्म्याबद्दल लक्षात ठेवला जाईल. यापूर्वी २५० आणि त्यापेक्षा अधिक धावसंख्या ही जिंकण्यासाठी सुरक्षित असल्याचे मानले जात होती. परंतु या हंगामात ही धावसंख्या देखील सुरक्षित राहिलेली दिसून येत नाही. आठवा जरा, केकेआर आणि पंजाब किंग्जचा मुकाबला. यात केकेआरने प्रथम फलंदाज करत २६२ धावा केल्या आणि ही धावसंख्या अन्य कोणत्याही हंगामात अगदी सुरक्षित वाटली असती. पण पंजाब किंग्जने आठ चेंडू राखून लक्ष्य गाठले. पाठलाग करत मिळवलेला विजय हा केवळ आश्चर्यकारकच ठरला नाही तर टी-२० च्या इतिहासात त्याची नोंदही झाली. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने सर्वांत मोठे २५९ धावांचे लक्ष्य गाठले होते. या टी-२० हंगामात फलंदाज हे गोलंदाजांवर दबदबा राखण्यात अनेक कारणांनी यशस्वी ठरले आहेत.

गेल्या काही दिवसांत गोलंदाजांची दयनीय अवस्था पाहून माजी क्रिकेटपटूंनी या स्थितीत सुधारणा आणण्यासाठी ब-याच टिप्स दिल्या. यात सर्वांत मोठी सूचना म्हणजे सीमेची मर्यादा वाढवणे. परंतु प्रश्न असा की, शंभर मीटरपेक्षा अधिक षटकार मारले जात असतील तर चौकाराची मर्यादा वाढवून फारसा फायदा नाही. यात खेळपट्टीची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच आधुनिक दर्जाच्या बॅट आणि आक्रमक खेळी देखील धावसंख्या उभारणीत योगदान देत आहे. या कारणांमुळे आयपीएलच्या या हंगामात गोलंदाजांना जरा अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनेकदा गोलंदाजांना चेंडू कोठे टाकावा, हे समजत नाही. श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन म्हणतो, फिरकी गोलंदाजांनी आता चेंडूला फिरवणेच थांबविले आहे. ते गतीत बदल करत विकेट घेऊ इच्छित आहेत. परिणामी फिरकीपटूंना यश मिळणे कमी झाले आहे. या कारणांमुळेच विकेट घेण्याच्या बाबतीत टॉप २० गोलंदाजांत चार फिरकीपटू यजुवेंद्र चहल, कुलदिप यादव, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. भारतात साधारणपणे कोरडी खेळपट्टी तयार केली जाते. त्यानुसार गोलंदाजांना प्रारंभी स्विंग आणि गती मिळण्यास मदत मिळते. तसेच जसजसा खेळ होतो, तसतसे खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळत राहते. याप्रमाणे चेंडू आणि बॅट यात संतुलन राहते. परंतु हवामान बदलाने हे संतुलन बिघडले आहे.

या हंगामात अधिक उष्णता असल्याने खेळपट्ट्या अधिक कोरड्या पडल्या आहेत तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने स्थिती आणखीच बिघडून टाकली आहे. एका क्युरेटरच्या मते, अधिक ऊन पडू लागल्याने खेळपट्ट्या शुष्क झाल्या आहेत आणि त्यावर गवत न ठेवल्याने आर्द्रताही दिसत नाही. हवामानात आर्द्रता कमी असल्याने खेळपट्टीच्या स्थितीत बदल झाला आहे. एकीकडे गोलंदाजांना खेळपट्टीकडून फारशी मदत मिळताना दिसून येत नाही तर दुसरीकडे यंग ब्रिगेड अधिक आक्रमक रूपाने खेळताना दिसत आहेत. फलंदाजाच्या डोक्यात गोलंदाजाविषयी अजिबात भीती राहिलेली नाही. समोर गोलंदाजी करणारा मिचेल स्टार्क आहे की ट्रेंट बोल्ट याच्याशी काही देणेघेणे नसते.

गोलंदाजाचा विचार केल्यास त्यांचे प्रमुख शस्त्र यॉर्कर असते. पण आता बहुतांश फलंदाज पुढे उभे न राहता क्रीझमध्ये बरेच आत थांबून यॉर्करचा परिणाम करत आहेत. तसेच लेप शॉट, रिव्हर्स फ्लिक यासारखे शॉट देखील कमी झाले आहेत. सध्याच्या काळात फलंदाज हे धावांची गती वाढविण्यासाठी षटकार मारण्यात मागेपुढे पाहत नाहीत. या कारणांमुळेच दिल्ली कॅपिटल्सचा जॅक मॅकगर्कने दोन वेळेस १५ चेंडूत अर्धशतक झळकावले. सामन्यात उभी राहणारी मोठी धावसंख्या आणि गोलंदाजांची होणारी धुलाई पाहता रविचंद्रन अश्विनने सोशल मीडियावर ‘सेव्ह बॉलर’ अभियान सुरू केले होते. पहिल्या सहा सामन्यांत एकही विकेट न मिळाल्याने अश्विन हा दुखावला गेला आहे. म्हणून अशी स्थिती ओढवली जाऊ नये यासाठी भारतीय संघाचे माजी कर्णधार हे बॅट आणि चेंडू यांच्यात संतुलन ठेवणे गरजेचे मानत होते. सुनील गावसकर म्हणतात, की सीमेची मर्यादा वाढविणे गरजेचे आहे. परंतु प्रेक्षकांना चौकार आणि षटकार पाहणे अधिक आवडते, हे बीसीसीआयला चांगलेच ठाऊक आहे.

चौकार आणि षटकारांची संख्या सतत वाढण्याचे कारण बॅटचा उंचावलेला दर्जा. अनेकदा वेगवान गोलंदाजांचा चेंडू हा केवळ बॅटच्या कडेला लागला तरी तो षटकार ठरत आहे. आधुनिक बॅटचाच करिष्मा म्हणजे आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ३८ सामन्यांत ६७८ षटकार लगावले गेले. हा वेग असाच राहिला तर गेल्यावर्षीचा ११२४ षटकारांचा विक्रम मोडला जाईल. फलंदाजांच्या खेळात आलेली आक्रमकता ही आश्चर्यकारक आहे आणि या हंगामात तर २६० धावसंख्या ही सातपेक्षा अधिकवेळा उभारली गेली. गेल्या हंगामात तर केवळ दोन वेळेस अडीचशेपेक्षा अधिक धावा झाल्या. हा वेग असाच राहिला तर भविष्यात ३०० पेक्षा अधिक धावा होतील आणि एखादा फलंदाज द्विशतक देखील लगावेल. चेंडू आणि बॅट याच्यात संतुलन ढासळल्याने आयपीएलमध्ये कमी धावसंख्येचे रोमहर्षक सामने कमी झाले आहेत. एकंदरीतच अशा प्रकारच्या खेळी इतिहासजमा झाल्या असेही म्हणू शकता. परंतु आपण जेव्हा विश्वचषक खेळतो, तेव्हा तेथे अशा प्रकारची खेळपट्टी मिळत नाही. तेथे आपल्या फलंदाजांना अडचणी येतात. म्हणून जूनमध्ये होणा-या टी-२० विश्वचषकाच्या अगोदर सर्व उणिवा दूर करणे गरजेचे आहे.

नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR