मुंबई : प्रतिनिधी
ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या तरुणींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि धक्कादायक विधान केले आहे. ओबीसी नेत्यांची सुंदर मुले आणि पैसा पाहून मराठा समाजाच्या तरुणी त्यांच्या घरात घुसतात, असे संतापजनक वक्तव्य वाघमारे यांनी केले आहे. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानाने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना नवनाथ वाघमारे यांनी थेट नेत्यांच्या घरातील महिलांना लक्ष्य केले. ते म्हणाले, स्वत: चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे की, माझी सून मराठा आहे आणि बायको कुणबी आहे. त्यांच्या घरात सगळे ‘सोयरे’ घुसले असतील. फक्त बावनकुळेच नाही, तर अनेक ओबीसी मंर्त्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसल्या आहेत. ओबीसी मंर्त्यांची गोंडस, सुंदर मुले आणि पैसा दिसला की मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात. जर हे मंत्री मराठ्यांच्या मुलींचे ऐकून ओबीसी समाजाचे वाटोळे करत असतील, तर त्यांनी थेट समोर येऊन सांगावे की आम्हाला ओबीसींशी काहीही देणेघेणे नाही.
मराठा समाजाला टार्गेट करण्यासाठी थेट महिलांचा अपमान केल्याने मराठा महिला संतप्त झाल्या आहेत. वाघमारे यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी नांदेडमध्ये ‘सकल मराठा समाजाच्या’ महिलांनी मोठा मोर्चा काढला. मनोज जरांगे पाटील यांच्यावरील द्वेषापोटी राजकारणात महिलांना ओढले जात असल्याचा आरोप करत, नवनाथ वाघमारे नांदेडमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा थेट इशारा महिला आंदोलकांनी दिला आहे.
माढ्यात (सोलापूर) गुन्हा दाखल करण्याची मागणी
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथेही मराठा समाज आक्रमक झाला असून, वाघमारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
राजकीय पातळी खालावली : रेखा कोंडे
शिवसेना नेत्या रेखा कोंडे यांनी नवनाथ वाघमारे यांना सडेतोड शब्दांत उत्तर देत त्यांच्यावर घणाघात केला. हा फक्त मराठा नाही, तर सर्व महिला वर्गाच्या सन्मानाचा विषय आहे. कोणत्याही समाजातील स्त्रीचा अपमान करणे हा खूप मोठा गुन्हा आहे. केवळ मराठा समाजातीलच मुली ओबीसी मुलांसोबत लग्न करतात असे नाही, तर आज अशी परिस्थिती आहे की कित्येक ओबीसी समाजातील मुली मराठा समाजातील मुलांसोबत लग्न करतात.
राजकीय नेत्यांना टार्गेट करण्यासाठी तुम्ही त्यांच्या घरातल्या महिलांपर्यंत पोहोचता, यावरून तुमची राजकीय आणि सामाजिक पातळी किती खालावली आहे हे स्पष्ट दिसते. स्वत:ला महात्मा फुलेंचे वारसदार म्हणवून घेता आणि जातीय राजकारणासाठी महिलांना टार्गेट करता. तुम्ही खोट्या आणि तकलादू विचारांवर जगणारी लोक आहात. असेही त्या म्हणाल्या.
















