लातूर : प्रतिनिधी
नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी लातूर जिल्ह्यातून हजारो भाविक पायी प्रवास करतात. रात्रीच्या अंधारात महामार्गावरून पायी जाणा-या भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून लातूर जिल्हा पोलीस दलाने विशेष उपाययोजना हाती घेतली आहे. भाविकांच्या अंगावरील जॅकेट, पाठीवरील सॅक तसेच पाण्याच्या बाटल्यांवर रिफ्लेक्टर लावून त्यांचा रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याचा स्तुत्य उपक्रम शहर वाहतूक शाखा, लातूर यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान तुळजापूरकडे जाणा-या भाविकांची मोठी वर्दळ असते. भाविक रात्रंदिवस पायी प्रवास करत असताना महामार्गावरून वेगाने जाणा-या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. विशेषत: रात्रीच्या वेळी अंधारामुळे पायी चालणारे भाविक वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शहर वाहतूक शाखा, लातूर यांच्या वतीने खोपेगाव अन्नछत्र येथे विशेष पोलीस पॉइंट सुरू करण्यात आला आहे. दसरा सण संपेपर्यंत या ठिकाणी २४ तास पोलीस अंमलदार आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी तुळजापूरकडे पायी जाणा-या भाविकांच्या जॅकेट, सॅक आणि पाण्याच्या बाटल्यांवर रिफ्लेक्टर लावण्यात येत आहेत. वाहनांच्या प्रकाशझोतात हे रिफ्लेक्टर चमकल्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून पायी जाणारे भाविक दूरवरूनच दिसू शकतात. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार असून भाविकांना सुरक्षितपणे तुळजापूरपर्यंत पोहोचता येईल, असा या उपक्रमामागील उद्देश आहे.
…………………१०………………..
















