भनवड-शिंदपाडा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू
नाशिक : शहरासह दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तीन तालुक्यांमधील विविध गावांमध्ये शनिवारी ((दि. ८)) रात्री १० वाजून १ मिनिटाला भूकंपाचा सौम्य झटका जाणवला. सुमारे २०-२२ सेकंदांपर्यंत जमीन थरथरली. तसेच काही ठिकाणी जोरदार आवाजदेखील नागरिकांना कानी पडला. मागील पंधरवड्यापासून भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची सलग मालिका जिल्ह्यात सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी, शास्त्रीयदृष्ट्या हे सौम्य तीव्रतेचे धक्के असल्याचे सांगितले आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री अचानकपणे भूकंपाचे धक्के वरील तालुक्यांमध्ये जाणवले. दिंडोरी तालुक्यातील भनवड-शिंदपाडा या ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. येथे ३.८रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्का जाणवल्याची नोंद करण्यात आली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा प्रशासनाकडून या भूकंपाच्या धक्क्यांच्या मालिकांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. शनिवारी जाणवलेल्या धक्क्याची उथळ खोली केवळ ३.२ किमी इतकी असल्याने जमिनीवर कंपण अधिक तीव्रतेने जाणवले. आतापर्यंत ५ किमी खोलीवर हे धक्के जाणवत होते. शनिवारी खोली अधिक कमी झाल्याचे दिसून आले.
या भागांंमध्ये अनुभवला धक्का
दिंडोरी, कळवण, पिंपळगाव बसवंत, ओझर, उमराळे, जांबुटके, राशेगाव, आशेवाडी, दरी, मातोरी, सिद्ध पिंप्री, पेठ, करंजाळी, जोगमोडी, र्त्यंबकप्रिंप्री, रोहिले, सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे, चास या भागांमध्ये भूकंपाचे धक्के काही सेकंदांपर्यंत नागरिकांनी अनुभवले आहे.
















