राज्यातील प्रश्नांसह विविध मुद्यांवर चर्चा करणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ फुटलेले खासदार आता शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यानंतर काल पहिल्यांदा या सर्व ६ खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांची भेट घालून दिली. या भेटीत पंतप्रधानांनी त्यांना मी तुमच्या पाठिशी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व ८ खासदार हे सोमवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. यामुळे दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विकासाच्या चौकटीतील अनेक प्रश्न आमच्या खासदारांचे आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी आमच्या पक्षाचे ८ खासदार मोदी यांना भेटणार आहोत. सोमवारी सकाळी ११ वाजता ही भेट होणार आहे, असे सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सध्या ८ खासदार आहेत. हे सर्वच्या सर्व खासदार पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या सर्व ८ खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यानुसार त्यांना पुढील आठवड्यात भेटीसाठी वेळ मिळू शकते.
एफसीआरएला विरोध
दरम्यान एफसीआरए बिलाला आमच्या पक्षाचा विरोध आहे. एफसीआरए बिल आमच्यावर लादू नका. चर्चा कारून योग्य मार्ग काढला पाहिजे. काही चुकीचे पैसे असतील, ड्रग्सचे पैसे असू शकतात. पण काही लोक मदत करणार असतील तर काय समस्या आहे, सगळ््याकडे वाईट नजरेने का बघावे, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.
















