निलंगा : प्रतिनिधी
घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईने हैराण झालेल्या नागरिकांच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी निलंग्यात वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर उन्हात रस्त्यावर चुली पेटवून भाकरी चहा बनवत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले.दरम्यान उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांच्या निवेदनासह भाकरी-चहा भेट दिल्या.
राज्यात सुरू असलेल्या ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून निलंग्यात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. महिला जिल्हाध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळपत्या उन्हात महिलांनी लाकडांच्या चुली पेटवून स्वयंपाक करीत गॅस अभावी नागरिकांना भेडसावणा-या अडचणींचे प्रतीकात्मक चित्र उभे केले. ‘सामान्य माणसाला गॅस कधी मिळणार?’, ‘जनता मांगे सिलेंडर, सरकार गप्प का?’’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शिवाय हातात विविध फलक घेऊन कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा सुरू करावा, दर कमी करावेत व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिका-यांना देण्यात आले.
यावेळी डॉ. हिरालाल निंबाळकर, तालुका प्रभारी देवदत्त सूर्यवंशी, मोहन सूर्यवंशी, श्रीमंत बनसोडे, साहेबराव कांबळे, अय्यूब कुरेशी, व्यंकट सूर्यवंशी, अरबाज शेख, विशाखा हातागळे, पुष्पा कांबळे, सुनीता लोकरे, शाहरुख कुरेशी आदीसह महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

