विरोधक एकवटले, ठाकरे बंधू, पवार, थोरांतसह प्रमुख नेत्यांचा सहभाग
मुंबई : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधात विरोधकांनी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि इतर पक्ष सहभागी होणार आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह सर्वच विरोधी पक्षनेते उपस्थित असणार आहेत. हा मोर्चा दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीट येथून सुरू होईल आणि मेट्रो सिनेमामार्गे मुंबई मनपा प्रवेशद्वाराजवळ थांबणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतचोरी, मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि मनसे उद्या शनिवार, दि. १ नोव्हेंबर रोजी एकत्रितपणे मुंबईत सत्याचा मोर्चा काढणार आहेत. जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊ नयेत, अशी विरोधकांची भूमिका आहे. उद्याच्या मोर्चानंतर सर्व विरोधी पक्षांकडून एकत्रित घोषणा केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील बोगस मतदार वगळेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अन्यथा कोर्टात जाण्याचा पर्याय स्वीकारला जाईल, असा इशारा महाविकास आघाडी आणि मनसेने दिला आहे.
महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षाच्या सत्याच्या मोर्चाला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले असून, कॉंग्रेसचे इतर नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या मतचोरीचा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीच आधी पर्दाफाश केला. त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
संविधान वाचवा,
लोकशाही जगवा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी संविधान वाचवा, लोकशाही जगवा, चलो मुंबई! उद्या १ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘मतचोरी’ आणि मतदार यादीतील घोटाळ््याविरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वपक्षीय ‘सत्याचा विराट मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. सर्व मतदारांनी या मोर्चात सहभागी होऊन लोकशाहीच्या संवर्धनासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
निवडणूक आयोगाविरुद्ध
ठाकरे बंधू कोर्टात जाणार?
एकीकडे मतदारयाद्यांतील घोळावर मनसे आणि विरोधी पक्षांकडून मोर्चा काढण्यात येत असून दुसरीकडे कायदेशीर लढा लढण्यासाठीही पावले उचलली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या २ दिवसांत त्यासंबंधी याचिका दाखल करण्यात येणार असून मतदार यादीमधील दोष पुराव्यासह कोर्टात सादर करणार असल्याची माहिती आहे.

