37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरनिवडणूक निकालाबाबत जनसामान्यांमध्ये उत्कंठा

निवडणूक निकालाबाबत जनसामान्यांमध्ये उत्कंठा

मंगळवेढा : रणजीत जोशी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात मंगळवेढा तालुक्यात ५८ टक्के मतदान झाले. आता कोण निवडून येणार यावर मतदार, कार्यकर्ते पैजा लावण्यात मग्न दिसून येत आहेत. ‘ताई की भाऊ?’ अशा चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे. शहराबरोबर गावच्या पारावर, चौकात गणित करणे सुरू झाले आहे. ५०० रुपयांपासून १ तोळे सोने अशी ७० हजार रुपयांपर्यंत शर्यत लागल्याची चर्चा आहे.

दरवेळी लोकसभा निवडणुकीकडे विधानसभेची पूर्वतयारी म्हणून पाहिले जाते. विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अस्तित्व व प्राबल्य दाखविण्यासाठी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला जास्तीतजास्त मते कशी मिळतील यासाठी प्रचार केला. भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी आ. समाधान आवताडे, माजी आ. प्रशांत परिचारक यांनी घोंगडी बैठका, प्रचारसभा आयोजित करून तसेच रॅली काढून प्रचार केला.

काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी भगीरथ भालके, अ‍ॅड. नंदकुमार पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शिवसेना तालुकाप्रमुख येताळा भगत, अ‍ॅड. अर्जुनराव पाटील, दत्तात्रय भोसले यांच्यासह पदाधिका-यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाला किती लीड मिळणार, टक्केवारीवरून व विधानसभा निवडणुकीत याचे काय परिणाम होतील, यावर चर्चा रंगू लागली आहे. तसेच कोणत्या आमदारांची किती लोकप्रियता आहे, हे निकालावरून स्पष्ट होणार आहे.

प्रत्येक जण कोण जिंकणार याचे भाकित करीत आहे. काही पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांमध्ये कोण जिंकणार याबाबत पैज लागत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे की भाजपचे राम सातपुते निवडून येणार यासाठी पैजा लावणे सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी आपलेही मतदारांमधील स्थान तपासून पाहिले.

लोकसभेतील मताधिक्यातून येणा-या काळातील विधानसभेचा ट्रेंड निश्चित होणार आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत ७ मे रोजी उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. निकालाच्या दिवशी ४ जून रोजी कोण निवडून येणार हे स्पष्ट होणार आहे. नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही या निवडणूक निकालाबाबत उत्कंठा लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR