40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमशाल पेटणार, शिट्टी वाजणार की धनुष्यातून बाण सुटणार?

मशाल पेटणार, शिट्टी वाजणार की धनुष्यातून बाण सुटणार?

हातकणंगले : डॉ. राजेंद्र भस्मे
राज्यातील शेवटचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीने मतदान पार पडले असून कोल्हापूरनंतर सर्वाधिक मतदान झालेला मतदारसंघ हातकणंगले आहे. यंदा या मतदारसंघात ६८.७ टक्के इतके मतदान झाले असून सर्वाधिक मतदान शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात ७०.९६ टक्के झाले आहे. हातकणंगलेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील, शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील हे किती मते घेणार एवढाच प्रश्न आहे. २० पेक्षा अधिक उमेदवार असले तरी लढत आहे ती चौरंगीच. यातील मतविभागणीचा फटका कुणाला बसणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

यंदा सत्यजित पाटील सरूडकर, धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यात खरी तिरंगी लढत होत असून मत विभागणीची चिंता तिन्ही प्रमुख उमेदवारांना सतावत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा शेतक-यांचा मतदारसंघ असून या भागात सर्वाधिक ऊस उत्पादन आणि साखर कारखाने असल्याने या भागातून सलग दोन वेळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे खासदार म्हणून संसदेत गेले आहेत. तर २०१९च्या निवडणुकीत युवा चेहरा आणि आक्रमक भाषण शैली आणि माने कुटुंबाचा या भागात असलेले वर्चस्व यामुळे धैर्यशील मानेंना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि मतदारांनी देखील भरभरून मतदान करत मानेंना लोकसभेत पाठवले मात्र धैर्यशील माने यांना ही लोकप्रियता सांभाळण्यात काही प्रमाणात अपयश आल्याचे यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले.

शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मतदारसंघात त्यांच्याविरुद्ध रोष पाहायला मिळाला.अखेरच्या क्षणी धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली. तर दुस-या बाजूला राजू शेट्टींनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती मात्र ही भेट निष्फळ ठरल्याने राजू शेट्टी यांनी अपक्ष लढण्याचे ठरवले तर महाविकास आघाडीने देखील मशाल चिन्हावर लढण्यासाठी शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले. यामुळे राजू शेट्टी यांचा सुखकर असलेला विजय हा अवघड झाला.

शाहूवाडी, पन्हाळा, इस्लामपूर, शिराळा या भागात सत्यजित पाटील यांचे मोठे वर्चस्व आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार सुजित मिंचेकर, माजी आमदार उल्हास पाटील, आमदार राजू आवळे यांच्यासह अनेक दिग्गज नेते सत्यजित पाटील यांच्या बाजूने असल्याने महाविकास आघाडीने या भागात प्रचारात आपली पकड चांगली धरली होती. तर धैर्यशील माने यांच्यासाठी नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडल्या. या सभांना मोठी गर्दी देखील जमली मात्र ही गर्दी मतदानामध्ये रूपांतरित करण्यात माने यांना किती यश आले हे चार जूनला स्पष्ट होईल.

या मतदारसंघात पार पडलेल्या मतदानात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शाहूवाडी तालुक्यातील सत्यजित पाटील स्थानिक उमेदवार असल्याने शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात यावेळी सर्वाधिक ७१ टक्के मतदान झाले पाठोपाठ हातकणंगले विधानसभा मतदारसंघात ७० टक्के मतदान झाले .
यामागे त्या मतदारसंघातील शहरी मतदारांचे प्रमाण कारणीभूत आहे. किमान १४ गावे अशी आहेत की, तेथील मतदान ८ ते १० हजार आहे.अशा गावांतून मतदान होण्यासाठी यंत्रणा राबवणे सोयीचे होते. शिवाय खासदार माने यांचा तालुका असल्याने त्यांनीही तिथे ताकद लावली होती. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात खासदार माने, सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात चढाओढ दिसली.

शिरोळमध्ये शेट्टी यांचीच हवा दिसून येत होती.इचलकरंजीने गेल्या निवडणुकीत खासदार माने यांना गुलाल लावला होता. यंदा शाहूवाडी मधून पहिल्यांदाच स्थानिक उमेदवार असल्याने सत्यजित पाटील यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती येथे पाहायला मिळाली. त्या पाठोपाठ शिराळा व वाळव्यातही सत्यजित पाटील यांची मशाल पेटताना दिसत आहे. तर त्यापाठोपाठ शेतकरी नेते म्हणून राजू शेट्टी यांनाही शिरोळ हातकणंगले इचलकरंजी भागातून चांगलं वातावरण आहे मात्र शेवटच्या दोन दिवसात अंडरकरंट झालेल्या हालचाली मुख्यमंर्त्यांनी व गृहमंत्री अमित शहा यांनी लावलेल्या जुळण्या या धैर्यशील माने यांच्या बाजूने किती राहणार हे पाहणं महत्त्वाचं असणार असून या मतदारसंघात कोणीही विजयी झाला तरी पराभूत होणारा उमेदवार आणि विजय होणा-यांमध्ये लीड जास्त नसणार हे नक्की आहे. यामुळे हातकणंगलेत मशाल पेटणार का? शिट्टी वाजणार की पुन्हा धनुष्यबाण सुटणार हे पाहणं औत्सुक्याच बनले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR