पुणे : एआय डेटा सेंटरमुळे ट्रम्प यांच्या पक्षाचा अमेरिकेत पराभव झाला आहे. तिथल्या लोकांनी सुद्धा या प्रकल्पाला नाकारले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी, लाईटचा वापर केला जातो, आणि त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी पाण्याचे नियोजन न केल्याने सर्व पाणी कर्नाटकमध्ये गेले आहे. इथे लोकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळणार नाही. उजनीतच पाणी राहिले नाही तर लोकांना पाणी मिळणार कुठून? असा सवाल पवारांनी केला आहे. केवळ नेत्यांना सपोर्ट करण्यासाठी एआय डेटा सेंटरचे समर्थन जर भाजपचे नेते करत असतील तर ते फार घातक आहे. सोलापूरचा एक जण डेंटा सेंटरमध्ये गुंतवणूकदार असून सर्व नेते त्यांच्या जवळ आहेत.
रोहित पवार म्हणाले की, हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे, लोकांच्या बाबतीमध्ये कमी आणि राजकारणाचा जास्त विचार करणारे हे सरकार आहे. शेतमजूर जर अडचणीत असतील तर रस्त्यावरची लढाई लढण्याची शक्ती स्वामी आम्हाला देवोत हीच प्रार्थना आम्ही केली आहे. आम्ही लढल्यानंतर यशसुद्धा मिळो. उजनीमध्ये जो डेटा सेंटरचा प्रकल्प येणार आहे त्यामध्ये दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असून त्यातून केवळ ४०० रोजगार मिळणार आहेत. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन प्रकल्प सुरू होत आहे. तिथे सहा लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. असे प्रकल्प तुम्ही महाराष्ट्रात दिले पाहिजेत.
आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांचे मोठे हाल
रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे हा आकडा भयानक आहे. शेतक-यांना सांगू इच्छितो की, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांचे मोठे हाल होतात. कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केली तर आई-वडिलांसह पत्नी आणि मुले उघड्यावर पडतात, त्यांना अनेक प्रश्न भेडसावत असतात. त्यामुळे शेतक-यांनी आत्महत्येचा विचार करू नये. शेतकरी एकत्र आले तर सरकारला झुकावेच लागेल.
शेतक-यांच्या समस्या सरकारला कळाव्या
रोहित पवार म्हणाले की, दिवाळी साजरी करत असताना अडचणीत असणा-या लोकांसोबत दिवाळी साजरं करणं गरजेचे आहे, असे वाटल्याने आम्ही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत आहोत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील शेतकरी आणि शेतमजूर यांच्यासोबत दिवाळी साजरी करत आहोत. माध्यमांच्या सहाय्याने लोकांच्या अडचणी सरकारपर्यंत जाव्यात हा आमचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर स्पष्टीकरण
रोहित पवार म्हणाले की, त्यांच्या पक्षात अंतर्गत वाद असतील तर त्यावर मी काय बोलणार. अजित पवारांना दोन्ही कुटुंबे एकत्र असावीत असे वाटत होते. मात्र, दादांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी अवघ्या १० दिवसांत राजकारण सुरू केले. दादा असते तर कदाचित विलीनीकरण झाले असते. तसेच, शरद पवार आजारी असल्याने काही लोक त्यांच्या भेटीला आले होते, मात्र काहींनी त्याला जाणीवपूर्वक राजकीय चर्चेचा रंग दिला. त्यातून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोजगारावरून सरकारवर टीका
रोहित पवार म्हणाले की, गुजरातमध्ये ६ लाख कोटींची गुंतवणूक होते आणि तिथे मोठ्या प्रमाणावर रोजगारही मिळतो. तशी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स तुम्ही सोलापूरला आणि महाराष्ट्राला द्या. एआय डेटा सेंटरमुळे ट्रम्प यांचा पराभव झाला. हे प्रकल्प मोठ्या प्रमाणात पाणी पितात, आरोग्याचे प्रश्न निर्माण करतात आणि रोजगारही अत्यल्प देतात. दीड लाख कोटींची गुंतवणूक करून केवळ ४०० नोक-या मिळणार असतील, तर त्याचा काय उपयोग? हे मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो.
















