36 C
Latur
Wednesday, March 25, 2026
Homeपरभणीपरभणी मनपा कार्यालय तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

परभणी मनपा कार्यालय तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

परभणी : शहरातील वांगी रस्त्यावरील अपनानगर परिसरातील श्री मारुती मंदिर महानगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात कारवाई करीत मंगळवारी पहाटे पाडले. या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेना व अन्य संघटनांनी मनपा कार्यालयाला टाळे ठोकत प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. परंतू आंदोलनाला दोन-तीन होऊनही कोणताही जबाबदार अधिकारी भेट देण्यास न आल्याने संतप्त आंदोलकांनी मनपा कार्यालयात तोडफोड केली होती. या प्रकरणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुकाराम कदम यांच्या फिर्यादीवरून रात्री नवा मोंढा पोलिसांत तब्बल १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क कार्यालयांतर्गत असलेल्या वांगी रस्त्यावरील अपनानगर परिसरातील श्री मारुती मंदिर परिसरात महानगरपालिकेने मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई केली होती. या कारणावरून मंगळवारी दुपारी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये काही नागरिकांनी अनधिकृत प्रवेश करून महापालिकेविरुद्ध घोषणाबाजी करीत कार्यालयाच्या काचा फोडल्या खुर्चाची तोडफोड केली. तसेच महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप लावले. दरम्यान उपस्थित कार्यालयीन कर्मचा-यांनी जमावास तोडफोड करू नका, कुलूप लावू नका असे म्हणाले असता जमावाने कर्मचा-यास ढकलून देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, अशोक गव्हाणे, राहुल शिंदे, अर्जुन झांबरे, माधव खुणे, नीरज बुचाल, धनंजय उर्फ बाळासाहेब जाधव, निखिल सक्तेपार, सचिन पाटील, माणिक पोंढे, आकाश गरुड, करण भरोसे, नरेश ईरळकर यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, महापालिकेच्या कार्यालयास कुलूप लावणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पंकज उगले हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR