लातूर : एजाज शेख
जिल्ह्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील पशुधनाच्या चा-याचा धांडोळा घेतला असता जिल्ह्यातील चा-याचे चित्र भयावह असल्याचे समोर आले. जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस नसल्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज होणारी चा-याची आवकही आता जवळपास थांबलीच आहे. जिल्ह्यात डिसेंंबरपर्यंत पुरेल एवढाचा चारा शिल्लक असल्यामुळे ९० दिवसांनंतर पशुधन जगवण्याची खरी कसरत होणार आहे.
जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार १८३ लहान-मोठी तर १ लाख ५४ हजार शेळ्या-मेंढ्या जिल्ह्यातील पशुधनाचा विचार करता दर महिन्याला अंदाजे १९९६.१३३ मेट्रिक टन चा-याची आवश्यकता भासते. जिल्ह्यामध्ये सध्या डिसेंबरपर्यंत पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर जिल्ह्यातून होणारी चा-याची आवकही बंद झाल्यामुळे चारा टंचाई अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना पाण्यासाठी व जनावरांच्या चा-याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. अल्प पावसामुळे खरिपातील पिके वाया गेली आहेत. दरवर्षी खरिपातील ज्वारी, बाजरी, भात, कडवळाचा चारा उपलब्ध होत असतो. यंदा, मात्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणा-या चा-याचेही प्रमाण कमी झाले आहे.
लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारणपणे १५ ते २० टन कडबा व १० ते १५ टन मक्याची आवक होत असते. यामध्ये लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांसह शेजारील जिल्ह्यांतून ऊसाचे वाडे व इतर हिरव्या चा-याची आवक होत असते. तर, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात कडब्याची आवक होत असते. यंदाच्या वर्षी मात्र ही चा-याची आवक प्रचंड घटली आहे. किंबहूना आवक थांबलीच आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या चा-याची आवक होतच नाही. मात्र, प्रत्यक्षात मागणी जास्त असल्यामुळे पैसे मोजूनही चारा मिळेनासा झाल्याने जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न शेतक-यांपुढे पडला आहे.
डिसेंबर २०२६ पर्यंत चारा टंचाई भासणार नाही. त्यानंतर ज्या महसूल मंडळात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे अशा मंडळात चारा डेपो तयार करून मागणीनुसार पशुपालकांना कानात बिल्ला व नोंदणी (ठऊछट) प्रमाणे शासन निर्णय झाल्यास वाटप करणे आवश्यक आहे. वनक्षेत्र, बांधक्षेत्र पडीक जमीन व कृषी पिकांची दुय्यम उत्पादन संभाव्य खरीप २०२६ या सर्व बाबी मधून ३८९२६१ मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल तो डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पशुधनाला पुरेल.
खरी कसरत होणार आहे ती, डिसेंबर २०२६ नंतर. त्यामुळे पशुधनाचा चारा म्हणून जे जे काही आवश्यक आहे त्याचे जतन करुन वर्षभर पुरेल, अशी तजवीज करावी लागणार आहे. शासनाने चारा छावण्या न उभारता चारा दावणीला द्यावा, अशी मागणी क्रां१तकारी शेतकरी संघटनेने केली आहे. कारण चारा छावणीचा उपयोग दुभती जनावरे आणि कामाच्या बैलांना होत नाही. चारा छावणी गैरी जनावरे पोसण्याचे ठिकाण बनते. तसेच चारा छावणी म्हटले की, भ्रष्टाचाराचे नवे कुरण तयार होते. त्यामुळे शासनाने पशुपालकांना कानात बिल्ला व नोंदणीप्रमाणे चारा किंवा चा-याचा पैसा शेतक-यांना द्यावा, अशीही मागणी आहे.















