शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरुर अनंतपाळ तालुक्यात दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना जनावरांच्या चा-याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतक-यांसमोर जनावरांना जगविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत ऊसतोडणीच्या वेळी उपलब्ध होणारे ऊसाचे वाडे चा-यासाठी मोठा आधार ठरू शकतात. त्यादृष्टीने शासनाने नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. ऊसाचे वाडे जाळण्याऐवजी किंवा वाया घालविण्याऐवजी त्याचा चारा म्हणून उपयोग केल्यास दुष्काळातील जनावरांना मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे वाडे संकलन आणि चारा वितरणाचे नियोजन करावे, अशी अपेक्षा शेतकरी व पशुपालकांकडून व्यक्त होत आहे.
थेट दावणीला चारा द्या
दुष्काळाच्या काळात चारा छावण्या सुरू करण्याऐवजी प्रत्यक्ष पशुपालकांच्या दावणीपर्यंत चारा पोहोचविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही होत आहे. चारा छावण्यांमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याने शासनाने प्रत्येक गावातील जनावरांची प्रत्यक्ष नोंदणी करून त्यानुसार चारा उपलब्ध करून द्यावा. यामुळे खोट्या जनावरांच्या नोंदीला आळा बसेल आणि शासनाचा निधी प्रत्यक्ष पशुपालकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.















