30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूरपहाटेच्या आगीत अकरा दुकाने खाक

पहाटेच्या आगीत अकरा दुकाने खाक

अहमदपूर : प्रतिनिधी
अहमदपूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाजूला असलेल्या गुणाले कॉम्प्लेक्समधील दुकानांना दि. ७ एप्रिल च्या पहाटे चार वाजता अचानक आग लागून आजूबाजूचे अकरा दुकानांची राख रांगोळी झाली असून या ठिकाणच्या मेडिकल, शेती अवजारे, लॉन्ड्री, डेंटल क्लिनिक, ब्युटी कलेक्शन, लेडीज एम्पुरिअर, स्वीट मार्ट, जनरल स्टोअर्स, किराणा दुकान यांना आग लागून जवळपास दोन कोटी तीस ते चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गुणाले कॉम्प्लेक्स येथे पत्र्याचे शेड मारून अनेक दुकाने काढण्यात आलेली आहेत. जिथपर्यंत दुकाने जळालेली आहेत त्याला लागून सोन्या-चांदीची दुकाने होती. ही आगीची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तेथे आग विझविण्यासाठी पाण्याची काहीच व्यवस्था नसल्यामुळे आगीमध्ये जास्त दुकानांचे नुकसान झाले. या आगीमुळे अनेक गोरगरीब दुकानदारांचे आयुष्य बरबाद होणार काय. शॉर्ट सर्किट होऊन लागली आहे की त्याचे इतर काही कारण आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

या लागलेल्या आगीमध्ये ज्ञानेश्वर गंगाधर पस्तापुरे यांचे मेडिकलचे दुकानाच्या बिलाची कागदपत्रे मेडिसिन, फ्रिज, फर्निचर असे दहा लाख रुपयांचे साहित्य जळून नुकसान झालेले आहे. न्यू समर्थ एजन्सी दुकानातील शेती वापराचे पाईप, पाण्याच्या मोटारी, ड्रीपचे बंडल व इतर शेतीचे साहित्य असे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. बाजूला असलेल्या संत गाडगेबाबा लॉन्ड्री दुकानातील २५०० शर्ट पॅन्ट, ४० नग साडी, सहा सूट व ब्लेझर व इस्त्री असे तीन लाख ५० हजार रुपयांचे अंदाजे नुकसान झाले आहे. समर्थ डेंटल क्लिनिकमधील डेंटल चेअर इन प्लांट सिस्टमचे साहित्य व चिकित्सक साहित्य, मशिनरी असे वीस ते पंचवीस लाख रुपयांचे अंदाजे नुकसान झालेले आहे. बाजूला असलेल्या ममता ब्युटी कलेक्शनचे ब्युटी कॉस्मेटिक साहित्य, बेन्टेक्स, ज्वेलरी बांगड्या, गिफ्ट अ‍ॅटम, खेळणी, बॅग, पर्स इतर ग्रहउपयोगी प्लास्टिक व स्टीलचे वस्तू असे ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.

मेमसाब ब्युटी कलेक्शनचे कॉस्मेटिक साहित्य, बेन्टेक्स, ज्वेलरी बांगड्या, गिफ्ट अ‍ॅटम, खेळणी, बॅग, पर्स व इतर ग्रहउपयोगी प्लास्टिक व स्टीलचे वस्तू असे २५ ते ३० लाख रुपयांचे अंदाजे नुकसान झालेले आहे. तर माऊली लेडीज एम्पोरियम अँड गिफ्ट सेंटरचे कॉस्मेटिक साहित्य, बेन्टेक्स , ज्वेलरी गिफ्ट अ‍ॅटम, खेळणी, बँग, पर्स, कॉम्प्युटर व इतर ग्रह उपयोगी साहित्य, फर्निचर असे २५ लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. मारुती स्वीट मार्टमधील स्वीट अ‍ॅटम, बिस्किट, ३ प्रकारचे फ्रीज, शोकेस, फर्निचर व इतर असे १९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच भदाडे लेडीज एम्पुरियम अँड गिफ्ट सेंटरचे कॉस्मेटिकचे साहित्य, बेन्टेक्स, ज्वेलरी गिफ्ट अ‍ॅटम, खेळणी, बॅग, पर्स, फोटो फ्रेम तयार करण्याची मशीन साहित्य, फर्निचर असे २६ लाख रुपयांचे अंदाजे नुकसान झाले आहे. याबरोबरच सार्थक जनरल स्टोअर्सचे कॉस्मेटिक साहित्य, शालेय साहित्य, इन्वर्टर, फर्निचर व जनरल स्टोअर्स साहित्य यांचे जवळपास १७ लाख रुपयांचे जळून नुकसान झालेले आहे.

लक्ष्मीनारायण किराणा दुकान अँड जनरल स्टोअर्सचे भीमराव नरहरी अंकुलवार यांचे किराणा व भुसार व इतर साहित्याचे जळून अंदाजे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. असे अंदाजे २ कोटी ३०-४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आली आहे. आग कशामुळे लागली याची मात्र माहिती समजू शकली नाही. आकस्मित नोंद घेऊन याचा पुढील तपास आयपीएस अधिकारी नवनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर व जमादार शिवाजी गुंडरे हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR