लातूर : प्रतिनिधी
श्रावणाची सुरुवात झाली असून २८ जुलैला श्रावणातील पहिला सोमवार होता. श्रावणातील पहिला सोमवार हा सर्व भक्तांसाठी विशेष महत्वाचा मानला जातो. त्यामुळे लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदीरात सोमवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती. रांगेत उभे राहून भक्तांनी श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेतले. यावेळी हर हर महादेवचा गजर करण्यात आला.
हा महिना भगवान शिवाच्या आराधनेसाठी महत्वाचा मानला जातो. त्यातच पहिला श्रावणी सोमवार खास असल्याने या दिवशी व्रत व महादेवाची पूजा करण्याचे विशेष फळ मिळते असे मानतात. त्यामुळे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदीरासह शहरातील तळ्यातील महादेव मंदीरातही शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदीर, तळ्यातील महादेव मंदीरसमोर बेल, फुल, नारळ आदी पुजा साहित्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती.