रेणापूर : सिद्धार्थ चव्हाण
रेणापूर तालुक्यात यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतक-यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामातील पेरणी केली मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतक-यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट गडद होत आहे.
शेतक-यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी झाल्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा दिवसेदिवस कमी होत आहे. परिणामी अनेक शेतांमध्ये बियाण्यांची उगवण अपुरी झाली असून काही ठिकाणी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणावर दुबार पेरणी करावी लागण्याची भीती शेतकरी व्यक्त केली जात आहेत. अगोदरच महागडी बियाणे, खते यावर मोठा खर्च झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांसाठी दुबार पेरणी म्हणजे अतिरिक्त आर्थिक बोजा ठरणार आहे. पावसाअभावी जनावरांच्या चा-याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली असली तरी शेतक-यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून समाधानकारक पावसाची प्रतीक्षा केली जात आहे
















