५० कोटींचे ड्रग्ज, ११ अत्याधुनिक शस्त्रे जप्त
बिकानेर : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरक्षा व्यवस्था कडक केली असून राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर सुरक्षा दलांनी आणि पोलिसांनी स्वातंत्र्यदिनापूर्वीपूर्वी अंमली पदार्थ तस्करीचा एक मोठा आंतरराष्ट्रईय कट उधळून लावला.
राजस्थानातील बिकानेर पोलिसांनी सीमेलगतच्या परिसरात राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान, ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानमधून भारतात पाठविण्यात आलेले तब्बल ५० कोटी रुपये मूल्याचे १० किलो हेरॉईन, ११ स्वयंचलित शस्त्रे, २२ मॅगझिन आणि १०० हून अधिक जिवंत काडतुसे जप्त केली. स्वातंत्र्यदिनापूर्वी घडलेल्या या कारवाईमुळे सीमा भागातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून, मोठा दहशतवादी किवा गुन्हेगारी कट उधळल्याचा दावा पोलिसांनी केला.
अतिरेक्यांनी ड्रोनच्या मदतीने शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थ भारतीय हद्दीत टाकले. ही खेप ताब्यात घेण्यासाठी आलेल्या एका संशयिताला पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेतले. वीरेंद्र सिंह असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो पाकिस्तानातून ड्रोनद्वारे टाकण्यात आलेला हा माल गोळा करण्यासाठी आला होता. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून, या आंतरराष्ट्रीय तस्करी सिंडिकेटस्शी जोडलेल्या इतर स्थानिक आणि परदेशी नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.
मध्यरात्री थरारक कारवाई
राजस्थानातील बिकानेर जिल्ह्याचे विशेष पथक, सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांनी काल मध्यरात्री सीमावर्ती भागांत एक संयुक्त शोधमोहीम राबविली. तपासादरम्यान, पाकिस्तानमधील तस्करांनी सीमेपलिकडून ड्रेनचा वापर करून हे ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांचा साठा भारतीय हद्दीत पाडला होता.
















