१ लाख ८ हजार क्युसेकचा प्रवाह, कृष्णेचे रौद्ररूप
पंढरपूर/सातारा : प्रतिनिधी
उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी व वीर धरणातून विसर्ग सोडण्यात आला. चंद्रभागा नदीपात्रातून सायंकाळी ५ वाजता १ लाख ५ हजार ९७९ क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू असून नदीने पाण्याची इशारा पातळी ओलांडली. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. दरम्यान, सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीने रौद्ररूप धारण केले आहे.
नगरपालिका प्रशासनामार्फत रायगड भवन, पंढरपूर येथे नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संभाव्य पूर परिस्थितीमुळे बाधित होणा-या नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून स्थलांतरित करण्यात येणा-या नागरिकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत भोजन व्यवस्था करण्यात आली असल्याचेही मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले. चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांनी पूर परिस्थितीच्या वेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही नगराध्यक्षा प्रणिती भालके व उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी केले आहे.
दरम्यान, साता-यात कृष्णा नदीने पुन्हा रौद्ररूप धारण केले आहे. साता-यातील लिंब-गोवे परिसरातील कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. नदीचा प्रवाह दुतर्फा आल्याने मंदिराकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला आहे. या भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेचा विसर्ग वाढविल्याने कृष्णेची पातळी २९ फुटांवर पोहोचली आहे.
















