निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा तालुक्यातील १६२ गावांचा समावेश असून ११७ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता तालुक्यातील ५४ गावे आणि १४ वाड्यांना, अशा एकूण ६८ गाव-वाड्यांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी ८४ बोअरवेल आणि ४० विहिरी असे एकूण १२४ जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत. मात्र, टंचाईची व्याप्ती वाढत असल्याने नवीन अधिग्रहणाची मागणीही वाढत आहे.
सध्या १०६ अधिग्रहण प्रस्ताव तहसील कार्यालयात, तर १४ प्रस्ताव क्षेत्रीय अधिका-यांकडे प्रलंबित आहेत. अशा एकूण १२० प्रस्तावांवर निर्णय होणे बाकी आहे. ही माहिती गटविकास अधिकारी सतीश पाटील यांनी ‘एकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन अधिग्रहण प्रस्तावांवर प्रशासनाकडून विलंब न करता तातडीने कार्यवाही केली जात आहे. अधिग्रहण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नसल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
















