36.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात कोण मारणार बाजी?

पुण्यात कोण मारणार बाजी?

पुणे : विनायक कुलकर्णी

येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजयाचे पारडे कोणाकडे झुकणार? मतदारांच्या मनात नेमके काय आहे? निवडणुकीच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात बदल होणार का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत रंगले आहेत. या सर्व चर्चेचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात एकाच परिवारातील दोन उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये निवडणूक होत आहे. या मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण सर्वांचे लक्ष दोन उमेदवारांवर केंद्रित झाले आहे.

येत्या दि. ७ मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. लोकसभा मतदारसंघात खडकवासला, भोर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.एका अर्थाने ग्रामीण आणि शहरी मतदारसंघ असे लोकसभा मतदारसंघाचे स्वरूप आहे. आणखी एक बाब म्हणजे या मतदारसंघावर आजपर्यंत काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र सध्याची बदलती राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकीत कोणाची सरशी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

त्याभोवतीच चर्चा रंगत आहे. एका अर्थाने ही निवडणूक दोन्ही उमेदवारांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची बनली आहे. या लोकसभा मतदारसंघात खडकवासला मतदारसंघावर दोन्ही उमेदवारांचा अधिक भर असल्याचे दिसून येते. त्याचे कारण म्हणजे या मतदारसंघात ग्रामीणबरोबर शहरी भाग मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळतो. आणि ही मते अधिकाधिक प्रमाणात मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.

गेल्या काही दिवसांत उकाड्यात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत पण त्याबरोबर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये रंग भरू लागला आहे. जाहीर सभांमधून होणारी टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप, सभांमध्ये कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा वाढता सहभाग, मतदारांशी संपर्क साधण्यासाठी आयोजित करण्यात येणा-या पदयात्रा, मेळावे यामुळे निवडणुकीचे वातावरण रंगतदार होण्यास मदत होते आहे. मतदारसंघाचा वाढता विस्तार, तो पिंजून काढण्यासाठी ऐन तळपत्या उन्हात करण्यात येणारे दौरे उमेदवारांच्या घरातील कुटुंबीयांचा प्रचारातील सहभाग यामुळे विजयाची गणिते मांडण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसून येते.
ही एक बाजू असली तरी सध्या शहरी आणि ग्रामीण भागात पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. पाण्याची टंचाई, वाढता उकाडा आणि प्रत्यक्षात होणारा पाणीपुरवठा याबाबत ठोस भूमिका घेतली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे.
निवडणुकीमध्ये मतदारसंघातील मतदार कोणाच्या बाजूने उभे राहणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे कारण यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. याचे कारण म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेले विभाजन, त्याचा होणारा परिणाम तर दुसरीकडे विकासाच्या मुद्यावर दिला जाणारा भर, हा मुद्दा देखील निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून मतदारसंघातील गावोगावी प्रचार करण्यावर कार्यकर्ते भर देत आहेत. एका अर्थाने बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघातील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी, त्याबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे.निवडणुकीसाठी पक्षाला मिळालेले नवे चिन्ह जनतेपर्यंत पोहोचविण्याचा केला जाणारा प्रयत्न, सहानुभूतीची वाढत असणारी भावना प्रकर्षाने जाणवत आहे.
निवडणुकीच्या मतदानास आता केवळ काही दिवस राहिले आहेत त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी प्रचारावर जोर दिला आहे. या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होणार असली तरी ती प्रत्यक्षात प्रतिष्ठेची होणार आहे, असे दिसते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR