37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुती - महाविकास आघाडीचे मताधिक्यासाठी जोरदार प्रयत्न

महायुती – महाविकास आघाडीचे मताधिक्यासाठी जोरदार प्रयत्न

मोहोळ : रणजित जोशी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात निर्णायक मतदान ठरत असलेला मोहोळ तालुका हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा तालुका आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे प्रतिबिंब मोहोळ तालुक्यात उमटताना दिसून येत आहे. लोकसभेसाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघात मूळच्या महाविकास आघाडीतील नेते यंदा प्रथमच भाजपसाठी प्रचार करीत असल्याचे चित्र दिसत आहे. वेगवेगळ्या पक्षांतील बहुतांश नेते महायुतीसोबत असले तरी अनेकांची प्रचार यंत्रणा स्वतंत्र राहिली आहे. तालुक्याच्या राजकारणात कायम एकमेकांचे विरोधक असलेले नेते महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले असले, तरी एकाच व्यासपीठावर सारे दिसत नाहीत. तर दुसरीकडे काँग्रेसचा तगडा स्थानिक नेता नसला तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते खिंड लढवताना दिसत आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा जिल्ह्यात सर्वाधिक मोहोळ तालुक्यात जाणवत आहे. तसेच कृषि उत्पादनांच्या दराचा विषयही अत्यंत संतप्तपणे सोशल मीडियावर मांडला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या माध्यमातून केंद्रातील विकासात्मक मुद्यांवर भर दिला जात आहे. तर काँग्रेसच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून स्थानिक मुद्यांवर अधिक जोर दिला जात आहे.
भाजपचे जुने नेते संजय क्षीरसागर यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करीत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेला थोड्या मतांनी पराभूत झालेले क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार रमेश कदम यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा मतदारसंघात एन्ट्री केली आहे. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. राजू खरे यांनीही प्रणिती शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अनगर येथील पाटलांच्या वाड्यात जाऊन राजन पाटील यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्याचा फोटो व्हायरल झाला. याप्रकरणी राजन पाटील यांनी स्पष्टीकरण दिले असले तरीही काही कार्यकर्ते अजूनही गोंधळात असून सोशल मीडियावर आपापली मते व्यक्त करत आहेत, दरम्यान, कोल्हापुरातील महाडिक भीमा परिसरात जोर लावत असून त्यांना उत्तर देण्यासाठी माजी मंत्री सतेज पाटील यांनीही प्रचारात एन्ट्री केली आहे.

माजी आमदार राजन पाटील यांचा भाजपबरोबर कायमच संघर्ष राहिला आहे. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून राम सातपुते यांच्यासाठी कटुता विसरून अजित पवारांची राष्ट्रवादी एकवटली आहे. मात्र माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, खासदार धनंजय महाडिक, संजय क्षीरसागर, मनोहर डोंगरे, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, माजी सभापती विजयराज डोंगरे, उद्योजक राजू खरे, माजी उपसभापती माने, चरणराज चवरे हे एकदाही एकत्र दिसले नाहीत. सगळेच स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवीत असल्याचे दिसत आहे. मोहोळ तालुक्यात मिळणारी लीड ही लोकसभेत विजयासाठी नेहमीच निर्णायक राहिली आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही मोहोळमध्ये मताधिक्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात स्थानिक नेत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR