24 C
Latur
Tuesday, February 24, 2026
Homeमहाराष्ट्रपुन्हा अवकाळी

पुन्हा अवकाळी

बळीराजाला फटका, रब्बी पिके भुईसपाट, फळझाडांचे नुकसान
मराठवाडा, विदर्भासह कोकणाला दणका
लातूर/धाराशिव : प्रतिनिधी
लातूरसह नांदेड, छ. संभाजीनगर, परभणी, बीड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यांतील ब-याच भागात रविवारी रात्री, सोमवारी पहाटे आणि दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, द्राक्ष फळबागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी वा-यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला आडवा झाला. त्यामुळे पिकांची हानी झाली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप पिके हातातून गेली. त्यामुळे शेतक-यांना रबी पिकांची आशा होती. परंतु ऐनवेळी अवकाळी तडाखा बसल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, तातडीने पंचनामा करून शेतक-यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या २ दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने लातूर जिल्ह्यासह बीड, नांदेड, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. लातूरमध्ये लातूर तालुक्यासह रेणापूर, निलंगा, चाकूर तालुका व इतर ब-याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. रेणापूर तालुक्यात सोमवारी सायंकाळी गारपीट झाली. वा-यामुळे घरावरील पत्रे उडाले. अवकाळी पावसाचा भाजीपाला, ज्वारी, गव्हासह रबी पिकांना मोठा फटका बसला. यासोबतच द्राक्ष, आंबा यासारख्या फळझाडांचेही नुकसान झाले.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा तालुक्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला. यासोबतच इतरत्रही ब-याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतपिकांची मोठी हानी झाली. नांदेड जिल्ह्यातही शहरासह जिल्ह्यात ब-याच भागात अवकाळीने दणका दिला. नांदेड शहरात सोमवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी ४ च्या सुमारास जिल्ह्यात हिमायतनगर, माहूर, लोहा, कंधार, किनवट, हदगावसह अन्य भागांत वादळी वा-यासह पाऊस झाला. यामुळे कापणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा, करडईसह रबी पिकांचे नुकसान झाले. तसेच केळी, द्राक्ष, आंब्याचीही हानी झाली.

बीड जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला असून, परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारात ज्वारी पिकाचे नुकसान झाले. वादळी वा-यामुळे पिके आडवी पडली आहेत. इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. वसमत शहरासह अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या रबी पिकांचे नुकसान झाले. आंबा उत्पादक शेतकरीही धास्तावले आहेत. परभणी शहरासह गंगाखेड, पालम तालुक्यांतील काही भागांत सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. आनंदवाडी, चाटोरी, बोरगाव, बंदरवाडी, खडी, नाव्हा, नाव्हलगाव, कांदलगाव या गावांना मोठा फटका बसला. त्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसला.

यासोबतच विदर्भात नागपूर, भंडा-यासह वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला. वाशिम जिल्ह्यात गहू, कांदा बिजवाई आणि हरभरा ही पिके भुईसपाट झाली. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. नागपुरात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो पोती धान्य भिजले. तसेच पिकांचीही हानी झाली. भंडारा जिल्ह्यात सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान अवकाळी पाऊस सुरू झाला. सध्या चना, वाटाणा आणि लाखोरी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी अवकाळी पाऊस झाल्याने पिकांची हानी झाली आहे. यामुळे शेतक-यांना रबीतही आर्थिक फटका बसू शकतो. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले आहे.

वीज कोसळून दोन ठार
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान शेतात काम करणा-या विशाखा सचिन येलकेवाड (३०) यांचा आणि उदगीर तालुक्यातील वायगाव येथील दिगंबर राम बेळकुंदे या शेतक-याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

कोकणातही फटका
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अवकाळीने हजेरी लावली. फोंडाघाटासह परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका आंबा आणि काजू पिकांना बसण्याची शक्यता असल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे.

१० राज्यांना अलर्ट
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील १० राज्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. फक्त पाऊसच नाही तर या राज्यांमध्ये वा-याचा वेग हा प्रतीसात ३० ते ४० किमी असा असण्याची शक्यता आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR