रेणापूर : प्रतिनिधी
खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली प्रक्रियेदरम्यान शेतकरी नेते गजानन बोळंगे यांच्याशी महिला रिकव्हरी एजंटने मुजोरपणे व अर्वाच्च भाषेत संवाद साधल्याचा प्रकार खलंग्री येथे घडला आहे तसेच संबंधित कंपनीकडून गावातील इतर नागरिकांनाही वारंवार फोन करून धमकावण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांनी बोळंगे परिवाराची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी धिरज विलासराव देशमुख यांनी स्वत: गजानन बोळंगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या प्रसंगी शेतक-यांवर अन्याय होऊ देणार नाही, शेतक-यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत, असा विश्वास त्यांनी दिला. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून आर्थिक अडचणींच्या काळात त्यांना आधार देण्याऐवजी खासगी वित्तीय संस्थांच्या वसुली प्रक्रियेतून मानसिक त्रास दिला जात असेल, तर अशा प्रकारांची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. वसुली करताना कायदेशीर चौकट आणि सभ्यतेचे भान राखले गेले पाहिजे, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, रेणापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन मोटेगावकर, लातूर ग्रामीण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत पाटील, विलास भोसले, बाळासाहेब करमुडे, राजेश सूर्यवंशी, उमेश गुणाले यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
















