लातूर : प्रतिनिधी
यंदाच्या मान्सूनने शेतक-यांना म्हणावी अशी साथ दिली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. जुनमध्ये पडलेल्या तुरळक पावसावरच शेतक-यांनी हिमतीने पेरण्या केल्या होत्या. पाऊसच गायब झाल्याने दुबारपेरणीचे संकट समोर उभे होते. जुलैअखेर पडलेल्या पावसाने पिकांना जीवदान दिले. तर दुसरीकडे बोगस बियाणांमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे दि. ३ ऑगस्ट रोजी शेतकरी नेते रघूनाथ पाटील यांनी लातूरला येऊन बोगस बियाणांच्या विरोधात कृषि अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
लातूर जिल्ह्यात यावर्षी आधीच पाऊस उशिराने पडला आणि त्यातच शेतक-यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र कृषि विभाग यावर कांीच कारवाई करत नसल्याने शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ् पाटील यांनी थेट कृषि अधीक्षक कार्यालयातच ठिय्या मांडत जिल्हा कृषि अधीक्षकांना जाब विचारला. तसेच बोगस बियाणे व खते निर्माण करणा-या कंपन्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी कृषि मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडेदेखील जाणार असल्याचे सांगीतले. सध्याचे सरकार हे ‘ढ’ विद्यार्थ्यांचे सरकार असून नापास सरकार असल्याची जळजळीत टीकादेखील शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी यावेळी केली.
राज्यभरात ज्या कांही शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत आणि शेतक-यांना जी कर्जमाफी सरकारने दिली ती कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी आहे. यासाठी दरवर्षी राज्यभरातील शेतकरी ९ ऑगस्ट रोजी एकत्र येतात त्याच प्रमाणे यावर्षीदेखील राज्यभरातील शेतकरी हे ९ ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यात एकत्र येणार आहेत आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.
















