लातूर : प्रतिनिधी
शहरात भुयारी गटार योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. सोमवार दि. ३ जुलै रोजी महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांनी सहका-यांसह या कामाची पाहणी केली. भुयारी गटारीच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांचे पॅचवर्क तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी कंत्राटदारास दिल्या. शहराच्या विविध भागात भुयारी गटार योजनेची कामे सुरू आहेत. त्यासाठी रस्ते खोदण्यात येत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी चिखल होणे, रस्ते खराब होणे अशा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या.
त्या अनुषंगाने महापौर जयश्रीताई सोनकांबळे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, सभागृह नेते विजयकुमार साबदे, सदस्य शिवाजी जवळगेकर, युनुस मोमीन, अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवसागर मंठाळे यांच्यासह शहराच्या विविध भागात पाहणी केली. कंत्राटदारही यावेळी उपस्थित होते. सध्या सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करावी. कामांसाठी ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचना त्यांनी संबंधित कंत्राटदाराला केल्या.
















