28.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeलातूरभटक्या, विमुक्त्तांच्या पालावर पोहचले जिल्हा प्रशासन!

भटक्या, विमुक्त्तांच्या पालावर पोहचले जिल्हा प्रशासन!

लातूर : प्रतिनिधी
विमुक्त्त जाती व भटक्या जमातीमधील घटकांना त्यांचा पालावर जावून शासकीय योजनांचा लाभ देण्याचा अभिनव उपक्रम बुधवारी लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आला. प्रशासनाने आपल्या दारात येवून शासकीय योजनांचा लाभ दिल्याने महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत क्षेत्रातील बु-हानगर येथील पालावरील भटक्या विमुक्त्तांच्या चेह-यावर समाधानाचे हास्य फुलले होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जवळपास ९० व्यक्त्तींना विविध लाभांचे वितरण करण्यात आले.
जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, समाज कल्याण सहायक आयुक्त्त शिवकांत चिकुर्ते, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, भटके विमुक्त विकास परिषदेचे नरसिंह झरे, राहुल चव्हाण यावेळी उपस्थित होते. विविध कारणांमुळे विमुक्त्त जाती व भटक्या जमातीमधील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार राज्यात पहिल्यांदाच भटक्या, विमुक्तांच्या पालावर जावून त्यांना शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी विशेष शिबीर लातूर जिल्हा प्रशासनाने आयोजित केले होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. महसूल विभाग, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी याठिकाणी उपस्थित राहून आपल्या विभागाशी संबंधित योजनांचे अर्ज भरुन घेवून लाभाचे वितरण केले.
लातूर तालुक्यातील महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत क्षेत्रात बु-हानगर येथे वैदू आणि मसणजोगी समाजातील कुटुंबांची वस्ती आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित केलेल्या शिबिरात महसूल विभागामार्फत रेशनकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व दाखला, जातीच्या प्रमाणपत्राच्या संचिका वितरीत करण्यात आल्या, तसेच राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजनेचे अर्ज भरुन घेण्यात आले. तसेच आरोग्य विभागामार्फत याठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले. शिक्षण विभागाने विमुक्त जाती व भटक्या जमाती घटकातील विद्यार्थ्यांना वह्यांचा संच वितरीत केल्या. बँकेमार्फत येथील नागरिकांचे बँक खाते काढणे, सामाजिक सुरक्षा योजनेचे अर्ज भरुन घेण्यात आले. पुरवठा विभागामार्फत अंत्योदय योजनेतून साडीचे वितरण करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR