माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल
जळकोट : प्रतिनिधी
उमेदवारांना पैशाचे आमिष दाखविणे, धमकावणे असे प्रकार लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत घडत आहेत. काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवारास दोन दिवसांपूर्वी अपहरण करून आज पोलिस बंदोबस्त देऊन त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी भाग पाडले. हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. पण भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष लोकशाहीचा खून करीत आहेत. त्यांच्यामध्ये निवडणुकीत सामना करण्याची हिंमत नाही असेच यावरून दिसून येते. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा प्रकार सध्या ठेकेदारी करणारे आमदार करीत असून यांना वेळीच धडा शिकवावा अन्यथा जळकोटचे वाटोळे व्हायला वेळ लागणार नाही, याचा विचार आपण करावा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या निमित्ताने जळकोट तालुक्यातील वांजरवाडा जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबूराव माधवराव जाधव, पंचायत समिती गणातील उमेदवार अंजू माधव कदम आणि जगळपूर (बु) पंचायत समिती गणातील उमेदवार वंदना माधव केसाळे यांच्या प्राचारार्थ दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी प्रचार सभा झाली., त्या प्रसंगी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले की, जळकोट तालुक्यातील वांजरवाडा हा भाग तसा खूप दुर्गम आहे. या ठिकाणी विकास होण्यासाठी वेळ लागतो आदरणीय विलासराव देशमुखसाहेबानी त्यावेळेस जळकोट तालुक्याला विशेष महत्व दिले व राज्याचे नेतृत्व करताना प्राधान्य दिले आणि परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य माणसाचा कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही, असे काम कार्यकर्त्यांनी करायला हवे आणि असेच आदरणीय विलासराव देशमुखसाहेबांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आम्ही या निवडणुकीत आपल्या समोर उमेदवार म्हणून उभे केले आहेत.
आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले, सोयाबीनला ७ हजार, कापसाला १४ हजार भाव देण्याचे आश्वासन दिलेले आज काय भाव देतात ते आपण पाहत आहात. शेतकरी कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन भाजपने, राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक काळात प्रचारादरम्यान दिले होते, ज्याची अजून अंमलबजावणी झाली नाही. राज्यातील व केंद्रातील कमळ, घड्याळ, धनुष्यबाण हे सर्व एका माळेचे मणी असून यांचे तिघांचेदेखील सोयीचे राजकारण सुरू आहे, हे लातूर मनपा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले आणि या ठिकाणी एकत्र निवडणूक लढत आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि आपल्या जळकोटचे हित कशात आहे, याचा विचार आपण करावा आणि खुर्ची साठी आपल्याला भूलथापा देणा-यांना,आपसात फूट पडणा-यापासून आपण सावध राहावे, असे ते म्हणाले.
भ्रष्टांना त्यांची जागा दाखवावी लागेल
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या भाजप सरकारच्या प्रशासक राजपासून आपली सुटका करून सामान्य माणसाची पिळवणूक करण्याचे काम बंद करून ही व्यवस्था बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी आपण लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार निवडून आणावे लागतील आणि या भ्रष्ट लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल. यासाठी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला असून आपण कोणाच्याही दडपशाहीला बळी न पडता आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले.

