इराणच्या प्रकल्पांवर हल्ला, इराणने कतार, कुवेतमधील प्रकल्प उडविले
तेहरान : वृत्तसंस्था
अमेरिका-इस्रायलने दक्षिण इराणमधील असलुयेह शहरातील साउथ पार्स गॅस क्षेत्र आणि तेल व वायू सुविधांवर हवाई हल्ल्यानंतर चौथाळलेल्या इराणने बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी रात्री सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, कुवेतमधील आईल रिफायनरी, गॅस सुविधांवर हल्ले चढविले. त्यामुळे गॅस आणि तेल जळून खाक झाले. धक्कादायक म्हणजे भारत कतारमधून मोठ्या प्रमाणात गॅस आयात करतो. याच कतारमधील सर्वांत मोठ्या रास लफान प्रकल्पावर हल्ला केल्याने भारतासह जगात ऊर्जासंकट ओढवल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. यामुळे तेल आणि गॅसचे दर वाढण्याचाही धोका आहे.
आखाती देशात पेटलेल्या युद्धामुळे जगावर ऊर्जासंकट ओढवण्याचा धोका वाढला आहे. गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेली ही लढाई फक्त क्षेपणास्त्रे आणि ड्रोनपुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती थेट ऊर्जा स्रोतांपर्यंत पोहोचली आहे. आधी अमेरिका-इस्रायलने दक्षिण इराणमधील असलुयेह शहरातील साउथ पार्स गॅस क्षेत्र आणि तेल व वायू सुविधांवर हवाई हल्ले केले. साउथ पार्स हे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र आहे. यानंतर इराणने सौदी आणि कतारमधील उर्जा आणि गॅस प्रकल्पांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. कतारचा सर्वांत मोठा गॅस प्रकल्प रास लाफानवरही क्षेपणास्त्र हल्ला केला. रास लफान भागात यामुळे मोठी आग लागली.
कतारचा हा भाग नॉर्थ डोम म्हणून प्रसिद्ध आहे. गॅस पुरवठ्यासाठी हे दोन्ही प्रदेश अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे एकमेकांच्या ऊर्जा क्षेत्रातील मा-यांमुळे युद्ध गंभीर वळणावर येऊन ठेपल्याचे दिसत आहे. कतारमधून भारताला जवळपास ४० टक्के गॅस पुरवठा केला जातो. तसेच इतर देशांनाही येथून मोठ्या प्रमाणात गॅस पुरविला जातो. त्यातच जवळपास पुढील १३ वर्षे जगाला पुरेल इतका साठा असताना कतारमधील रास लाफान प्रकल्पावर हल्ला केल्याने कतारचे मोठे नुकसान झाले असून, या हल्ल्यामुळे जगाच्या गॅस पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणने नागरिक आणि महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करून रेड लाइन ओलांडली आहे. अशा हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशातील परिस्थिती चिघळू शकते, असा इशारा दिला. त्यातच इस्त्रायलकडून साउथ पार्स क्षेत्रावर कोणताही पुढचा हल्ला केला जाणार नाही. पण इराणने पुन्हा एकदा कतारसारख्या निष्पाप देशावर हल्ला केला तर अमेरिका इराणच्या संपूर्ण साउथ पार्स गॅस फिल्डला उडवून देईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
जगाला १३ वर्षे पुरेल
इतका गॅस साठा नष्ट?
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे पुढील १३ वर्षे संपूर्ण जगाची गरज भागवू शकेल, एवढा गॅस जिथे उपलब्ध आहे, त्या कतारमधील सर्वांत मोठी दोन गॅस केंद्रे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून, याचा गॅस पुरवठ्याच्या साखळीवर विपरित परिणाम होऊ शकतो. यातून गॅसच्या किमतीचा भडका उडू शकतो.
भारताला मोठा धक्का
भारत तेलाच्या आयातीबाबत मोठ्या प्रमाणावर कतारवर अवलंबून आहे. एलएनजीच्या एकूण गरजेपैकी भारत ३८ ते ४० टक्के गॅस कतारमधून आयात करतो. कतारच्या रास लफान भागातून प्रामुख्याने या गॅसचा पुरवठा होतो. त्यामुळे कतारमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे भारताचे टेन्शन वाढले आहे.
रास लफानची वैशिष्ट्ये
-जगातील सर्वात मोठे एलएनजी हब
-जगभरातील देशांना एलएनजी आणि इतर पेट्रोकेमिकल उत्पादनांची इथून निर्यात
-कतारच्या अर्थव्यवस्थेचा कणा
-रास लफानमध्ये अडथळा आला तर जागतिक गॅस पुरवठ्यावर परिणाम.
-अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होण्याचा धोका
तेलाच्या किमती
वाढण्याची शक्यता
या युद्धाच्या झळा आता संपूर्ण जगाला बसण्यास सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती २०० डॉलर्स प्रतिबॅरलवर जाण्याची शक्यता आहे. बंद झालेली होर्मुझची सामुद्रधुनी आणि आता पार्स क्षेत्रावरील हल्ल्यामुळे तेलाच्या किमती कमालीच्या भडकण्याची भीती आहे. तज्ज्ञांनीही तसा अंदाज व्यक्त केला. युद्ध सुरू होऊन ३ आठवडे झाले आहेत. हे युद्ध लवकर संपण्याची शक्यता नाही.

