Homeमहाराष्ट्रभोंदूबाबा अशोक खरातची एसआयटीमार्फत चौकशी

भोंदूबाबा अशोक खरातची एसआयटीमार्फत चौकशी

७ तास झाडाझडती, पोलिस कोठडीत रवानगी
नाशिक : प्रतिनिधी
महिलांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातवर बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याची एसआयटीकडून चौकशी केली जात आहे. तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधाचे पुरावे आणि इतर माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. तसेच खरातचा जबाबही नोंदवून घेण्यात आला. आज एसआयटीने खरातची तब्बल ७ तास चौकशी केली. आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात चौकशी सुरू आहे. दरम्यान, चौकशीनंतर खरातची कोठडीत रवानगी करण्यात आली.

अशोक खरात महिला अत्याचार आणि लैंगिक शोषण प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले असून त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी विरोधी पक्षातील महिला नेत्यांकडून केली जात आहे. त्यात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्याकडूनही ही मागणी होत आहे. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात समवेतचे अनेक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले. तसेच खरातच्या शिवनिका संस्थेच्या सदस्यपदीही रुपाली चाकणकर यांची वर्णी होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला. दुसरीकडे एसआयटी कोठडीत असलेल्या अशोक उर्फ कॅप्टन खरातची आज एसआयटी पथकाकडून तब्बल ७ तास चौकशी केली. त्यानंतर एसआयटी पथकाने अशोकची पोलिस कोठडीत रवानगी केली.

दरम्यान, या चौकशीदरम्यान अशोक खरातच्या ऑफिसमधील बॉय नीरज जाधव आणि खरात यांची सामोरासमोर चौकशी सुरू होती. यावेळी कॅप्टन खरात आणि नीरज जाधवमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महिला अत्याचार, बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी नीरज जाधव आणि कॅप्टन खरात यांची पहिल्यांदाच एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. अशोक खरातचे राजकीय संबंध, तसेच व्यावसायिक मालमत्तांचीही चौकशी करण्यात येत आहे.

केसरकरांचे निकटवर्तीय
दीपक लोंढेंची चौकशी
या तपासात नव्या घडामोडी समोर येत असून, दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांची विशेष तपास पथकाकडून कसून चौकशी करण्यात आली. लोंढे आणि अशोक खरात यांच्यात काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. विशेषत: सिन्नर परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत लोंढे सक्रिय असल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR