मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक, तसेच एका जागेची पोटनिवडणूक १२ मे रोजी होणार असून, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची गुरुवारपर्यंत मुदत असून, अजून भाजपासह महायुतीतील तिन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यामुळे उत्सुकता वाढली आहे.
विधानपरिषदेच्या ९ जागांसह प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेची पोटनिवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळ बघता या १० पैकी ९ जागा महायुतीला, तर एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. निवृत्त होणा-या सदस्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यांनीच आघाडीकडून निवडणूक लढवावी अशी भूमिका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परवा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली व उद्धव ठाकरे उद्यापर्यंत याबाबत निर्णय घेतील असे ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीतील भाजपा पाच, शिवसेना २ व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक जागा लढवण्याची शक्यता आहे. भाजपच्या प्रदेश शाखेने केंद्रीय समितीकडे १३ नावांची शिफारस केली आहे. भाजपकडून प्रज्ञा सातव, संजय केणेकर, माधवी नाईक, राजेंद्र फडके,राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, अर्चना दयाशंकर तिवारी, उपेंद्र कोठेकर यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे दोन उमेदवार रिंगणात उतरणार असून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. दुस-या जागेसाठी शीतल म्हात्रे, बच्चू कडू यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट एक जागा लढवणार असून तब्बल ७५ जणांनी यासाठी रांग लावली आहे.

