नगरपालिका निवडणुकीत बाजी, भाजप सर्वांत मोठा पक्ष
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने बाजी सर्वाधिक ११७ ठिकाणी वर्चस्व मिळविले. त्यानंतर शिंदे सेनेने ५३ ठिकाणी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ३७ ठिकाणी विजय मिळवित महायुती म्हणून २०० चा टप्पा पार केला असून, भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. या निवडणुकीत भाजपचे जवळपास ३ हजारांवर नगरसेवक निवडून आले. विरोधकांनी महाविकास आघाडी म्हणून न लढता सोयीनुसार आघाडी केली. यात कॉंग्रेसला ब-यापैकी यश मिळाले. मात्र, राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वांत कमी जागा मिळाल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणेच स्थानिक निवडणुकीतही विरोधकांना मोठा फटका बसला.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख पक्षांनी मोठे यश मिळवले. भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात प्रमुख लढती झाल्या. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी आक्रमकपणे प्रचार केला. या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. भाजपचे ११७ नगराध्यक्ष निवडून आले. भाजपची ही राज्यातील आतापर्यंतच्या नगरपालिका निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. भाजपने पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात चांगली कामगिरी केली.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत चांगली कामगिरी केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यातील ५३ नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडून आणले. सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेने भाजप, शेकापच्या पॅनेलला पराभूत केले. कोकणात शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, निलेश राणे यांनी चांगली कामगिरी केली. कोकणात शिंदे यांच्या शिवेसनेचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले. नाशिकमध्ये ११ पैकी ५ ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाले. पालघर जिल्ह्यातील पालघर आणि डहाणू येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ३७ नगरपरिषद आणि नगरपंचायतीत नगराध्यक्ष निवडून आणले. अजित पवारांनी पुणे जिल्ह्याच्या होम ग्राऊंड पुन्हा चांगली कामगिरी केली. बारामतीत तर एकतर्फी विजय मिळविला. जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने १७ नगरपरिषद आणि नगरपंचायतींपैकी १० ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाबळेश्वर आणि पाचगणीत नगराध्यक्ष विजयी झाले. कोल्हापूर, बीड जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले.
कॉंग्रेसने महाविकास आघाडीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आघाडी घेतली. कॉंग्रेसने २८ ठिकाणी यश मिळविले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ०७ ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले. माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उरुण ईश्वरपूर, आष्टा नगरपालिकेत पक्षाने यश मिळवले. रायगडमधील उरण येथे राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर विजयी झाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक पदाधिका-यांवर निर्णय सोपवले होते. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ०९ ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले. सोलापूरमधील कुर्डुवाडी, रायगडमधील श्रीवर्धन यासह इतर ठिकाणी शिवेसना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष विजयी झाले. वंचित बहुजन आघाडीलाही या निवडणुकीत यश मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडीने अकोल्यातील बार्शी टाकळी आणि अमरावतीमधील चांदूर रेल्वे नगरपरिषेदत नगराध्यक्ष निवडून आणले. स्थानिक आघाड्यांचे ३७ ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले. चंद्रपूर जिल्ह्यातही कॉंग्रेसने आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे मुनगंटीवार यांना धक्का बसला.
भाजपने यशाचे श्रेय
कार्यकर्त्यांना दिले
या विजयाचे श्रेय भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि राज्यातील जनतेला देण्यात आले. पक्षाने पूर्ण ५१ टक्क्यांची लढाई जिंकण्याच्या उद्देशाने ही निवडणूक लढविली होती आणि त्यात त्यांना यश आले. या विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची जादू महत्त्वाची ठरली आहे.
राज्यात विकासाच्या
राजकारणाला प्राधान्य
जनतेने विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले. जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आणि सरकारच्या विकासाच्या धोरणांच्या मागे उभी असल्याचे या निकालातून स्पष्ट झाल्याचे भाजपने म्हटले आहे.

