35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीचा तिढा कायम

महाविकास आघाडीचा तिढा कायम

चर्चा सकारात्मक, चार तास चालली बैठक

मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीत चर्चेचे सत्र सुरू आहे. मात्र, जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना, अशी स्थिती झाली आहे. आजही जवळपास ४ तास बैठक चालली. या बैठकीला वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते. या बैठकीत सोलापूरसह ५ महत्त्वाच्या जागा मागितल्या. मात्र, त्यावर तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, अ‍ॅड. आंबेडकर मध्येच निघून गेले. त्यानंतरही मविआची बैठक झाली. परंतु ३९ जागांवरच एकमती झाल्याचे समजते. आता ९ मार्च रोजी बैठक होणार आहे. त्यावेळी हा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वरळी येथील हॉटेल फोर सिजन येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर बैठकीला उपस्थित होते. यावेळी जागा वाटपाचा तिढा सुटला जाण्याची आणि फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र वंचित बहुजन आघाडीने पाच जागांची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम आहे.

महाविकास आघाडीची बैठक सकारात्मक झाली आहे. बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती होती. ४८ जागांवर आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकाही जागेविषयी मतभेद नाहीत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे, त्या प्रस्तावावर चर्चा झाली, असे खा. संजय राऊत म्हणाले.

वंचितने मागितल्या ५ जागा
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतील पक्षांकडे अकोला, अमरावती, रामटेक, दिंडोरी आणि सोलापूर या जागांची मागणी केली आहे. मात्र, यामध्ये रामटेकच्या जागेवर शिवसेना आणि काँग्रेसचाही दावा आहे. अमरावती आणि सोलापूरवर काँग्रेसने दावा केला तर दिंडोरीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे तिढा वाढला आहे.

हुकुमशाही उलथवून
टाकण्यासाठी एकत्र
पंतप्रधान मोदींची हुकूमशाही उलथवून टाकण्यासाठी प्रकाश आंबेडकरांसह आमच्या सगळ््यांचे एकमत आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत येतील, आजची बैठक सकारात्मक झाली असून पुढच्या बैठकीत आणखी स्पष्टता येईल, असे खा. संजय राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR