29.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeसोलापूरमाढा लोकसभेला काट्याची टक्कर

माढा लोकसभेला काट्याची टक्कर

रणजीत जोशी : सोलापूर
माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट झाले असून धैर्यशील मोहिते-पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहिर झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नेतृत्व केले आहे, तर मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयसिंह मोहिते-पाटील यांनी याच मतदारसंघात विजय प्राप्त केला होता. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाची देशपातळीवर विशेष ओळख आहे. कालांतराने मोहिते-पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे फलटणचे रणजितसिंह निंबाळकर हे विजयी झाले.

यामध्ये मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातून एक लाखाचे मताधिक्य त्यांना मिळाले होते. पुन्हा सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचीच उमेदवारी
जाहीर केली. यामुळे मोहिते-पाटील व फलटणचे रामराजे निंबाळकर यांनी त्यांना विरोध केला. त्यांच्या उमेदवारीसाठी मतदारांमधूनही विरोध असल्याचे सोशल मीडियावरूनही प्रसिद्ध होत होते.

निंबाळकरांची उमेदवारी बदलून दुसरा उमेदवार त्या ठिकाणी द्यावा, अशी मोहिते-पाटील व रामराजे निंबाळकर यांनी भाजपकडे मागणी केली होती, तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी विविध माध्यमातून व्यक्त होत होती. धैर्यशील मोहिते-पाटील यांचे चुलते व सहकारमहर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयंिसह मोहिते-पाटील यांनी आपले सर्व कुटुंब धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे. याच कालावधीत जनमताचा कौल जाणून घेण्यासाठी मोहिते-पाटील परिवारातील सदस्यांनी मतदारसंघात फिरुन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांची मते जाणून घेतली होती. या भेटीतून धैर्यशील मोहिते- पाटील यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पुढे येऊ लागले. आणी धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभेच्या मैदानात उतरले.

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची होत असून मतदारसंघातील सर्व आमदारांनी विद्यमान खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसरीकडे मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतल्याचे दिसून येत आहे. शरद पवारांच्या – तुतारीसाठी मतदारांनी कंबर कसल्याचे चित्र आहे. राजकीय वातावरण पाहता सर्व आमदार व कार्यकर्ते एका बाजूला तर सामान्य मतदार तुतारीच्या बाजूला असल्याचे बोलत आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघामध्ये माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळसिरस, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यांचा सामावेश आहे. या तालुक्यातील सर्वच आमदार हे भाजपाच्या खा. रणजितंिसह नाईक-निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत. खा. निंबाळकर यांच्या विरोधात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते-पाटील यांचे पुतणे धैर्यशिल मोहिते-पाटील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून हातात तुतारी घेऊन उभे आहेत. मागील पाच वर्षांची खा. ंिनबाळकर यांची अपयशी व निष्क्रिय कार्यकीर्द, लोकांशी विसंवाद, ध्येयधोरणे, मराठा आरक्षण यासह अनेक कारणाने मतदार खासदारांवर संतापला आहे. लोकसभा मतदारसंघातील सर्वच आमदार व त्यांच्या पदाधिका-यांनी मतदारांना समजावण्याचा प्रयत्न केला तरीदेखील बहुतांश मतदार समजून घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. मतदारांना समजावता समजावता सर्वच आमदारांची दमछाक झाल्याचे पहावयाचे मिळत आहे.उलटपक्षी शरद पवारांना सर्वसामान्य मतदार, शेतकरी, शेतमजूर, छोट्या-मोठ्या उद्योजकांचा वाढता पाठिंबा व सहानभूती मिळत असल्याने मोहिते-पाटलांना याचा फायदा होताना दिसत आहे.

टेंभुर्णी येथील चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात शेतक-याने आपली कशी फसवणूक झाली याचा पाढाच वाचला. त्या शेतक-याला दमदाटी करत बाहेर काढल्याने देखील शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यावरूनच कमळाकडे मतदार वळवण्यासाठी कार्यकर्त्यांना किती प्रयत्न करावे लागत आहेत. हे दिसून येत आहे. मोहिते-पाटील यांच्याबरोबरच शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार माढा लोकसभा मतदारसंघामध्ये असल्याने मोहिते-पाटलांचे आव्हान निंबाळकरांसमोर उभे ठाकले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR