31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeधाराशिवधाराशिव मतदार संघात वाजतोय घड्याळाचा गजर

धाराशिव मतदार संघात वाजतोय घड्याळाचा गजर

 धाराशिव : सुभाष कदम
माजीमंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून भाजपवासी झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कुपोषित होऊन विकलांग झाली. बोटावर मोजण्याएवढे नेते व कार्यकर्ते पक्षात शिल्लक राहीले. त्या तुलनेत जिल्ह्यात शिवसेना, भाजप हे पक्ष बलवान होत गेले. राष्ट्रवादी पक्षात नेते, कार्यकर्तेच राहिले नसल्याने पक्ष अस्तित्वहिन होऊन नावापुरताच शिल्लक राहीला होता. परंतू, राज्यात राजकीय समीकरणे बदलली आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाली. लोकसभा निवडणुकीत तर चक्क पक्षाच्या उमेदवाराला तेही घड्याळ चिन्ह मिळाले आहे. आता गेल्या काही वर्षात कुपोषित झालेली राष्ट्रवादी काँग्रेस दिवसेंदिवस बाळसे धरू लागली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा नवीन पक्ष स्थापन केला. पहिल्याच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे खासदार व आमदार मोठ्या संख्येने निवडून आले होते. केंद्रातील काँग्रेस प्रणित युपीए आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीला मंत्री, राज्यमंत्री पदे मिळाली. महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार सत्तेवर आले. ते सलग पंधरा वर्षे सत्तेवर होते. धाराशिव जिल्ह्यात माजीमंत्री डाँ. पद्मंिसह पाटील यांनी शरद पवार यांना साथ दिली. ते आघाडी सरकारमध्ये काही वर्षे कॅबीनेट मंत्री होते. पुढे त्यांचे चिरंजीव राणाजगजितंिसह पाटील विविध खात्याचे राज्यमंत्री झाले. २००९ मध्ये डॉ. पाटील राष्ट्रवादीचे खासदार होते. आ. राणा पाटील हे कळंब-उस्मानाबाद मतदारसंघाचे तर राहुल मोटे हे परंडा-भूम-वाशी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार होते.

त्यामुळे एकूणच धाराशिव जिल्हा राष्ट्रवादीमय झालेला होता. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु या पक्षाचे जिल्ह्याचे नेते, माजी मंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मोदी लाटेचा धसका घेऊन १०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते तुळजापूर मतदार संघातून आमदार झाले. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. साहजिकच निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात घड्याळाचा गजर सुरू झाला आहे.

भविष्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये काही जागा लढण्यासाठी मिळतील व एखादा आमदार ही या पक्षाचा होऊ शकतो. एकप्रकारे अस्तित्वहिन झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पुर्वपदावर येऊ लागली आहे. काँग्रेसचा प्रवास मात्र खडतर असून पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. औसा व उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये बोटावर मोजता येतील, एवढेच पुढारी व मतदार शिल्लक राहीले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR