35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरमालमत्ता कराच्या अभिलेखांतील  त्रुटींची होणार दुरुस्ती

मालमत्ता कराच्या अभिलेखांतील  त्रुटींची होणार दुरुस्ती

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानरगपालिकेच्या वतीने मालमत्ता सर्वेक्षण व पुनर्मुल्यांकनाचे काम करण्यात आलेले आहे. यात त्रुटी असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या नागरिकांचे आक्षेप आहेत त्या नागरिकांनी दिलेल्या कालावधीत संपर्क साधून आपले अभिलेखे दुरुस्त करुन घेण्याचे आवाहन लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लातूर शहर मनपाच्या वतीने २०१५ यावर्षी मालमत्ता सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकनाचे काम हाती घेण्यात आले होते. २०१७- १८  या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण झाले. त्यावर्षी मालमत्ताधारकांना विशेष नोटीसा देऊन आक्षेप मागविण्यात आले होते. त्या आक्षेपावर सुनावणी घेवून व आक्षेपांचे निराकरण करुन प्रत्यक्षात कर वसुली सुरुवात करण्यात आली आहे. सध्या मनपाकडे उपलब्ध असलेल्या मालमत्ता कर मागणी अभिलेख्यांमध्ये काही प्रमाणात त्रुटी असल्याच्या तक्रारी येत आहेत. मालमत्तेची नोंद धारकाच्या नावे नसणे, कर आकारणीमध्ये जास्तीचा दर लावणे, मालमत्तेचे मोजमाप चुकीचे असणे, वापराच्या प्रकारामध्ये बदल तसेच पाणीपट्टी कर आकारणीबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. मालमत्ता कर वसुलीसाठी हे अभिलेखे दुरुस्त करणे आवश्यक आहे. नागरिक मालमत्ता कर भरतेवेळी तक्रारी करत आहेत. या तक्रारींचे निराकरण करुन डेटा दुरुस्त करण्याच्या उद्देशाने मनपाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयामध्ये विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. मालमत्ताधारकांनी त्या दिवशी क्षेत्रीय कार्यालयात पुराव्यासह उपस्थित राहून अर्ज करणे आवश्यक आहे.
ज्या मालमत्ता धारकास धारक म्हणून मालमत्ता कराचे मागणी बिल येत आहे अशा मालमत्ता धारकांनी अर्जासोबत मालकी हक्काबाबत खरेदीखत, सातबारा, सिटी सर्वे उतारा, विकास कर व हस्तांतरण कर भरणा केल्याची पावती, सूचना पत्रकाची प्रत सादर करावी. मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्तेची नोंद नियमानुसार मनपामध्ये केलेली नसेल तर खरेदी खत, सातबारा उतारा, सिटी सर्वे उतारा अशा प्रकारचे मालकी हक्काचे दस्तावेद दस्तावेज सादर करुन नियमानुसार शुल्काचा भरणा करुन मनपा कर मागणी अभिलेख्यांमध्ये नोंद करुन घ्यावी.
मागील आर्थिक वर्षात कराचा भरणा केलेला असतानाही मागणी बिलामध्ये थकीत कराचा समावेश झाला असेल तर अशा मालमत्ताधारकांनी आपल्याकडील कर भरणा केल्याची पावती सादर करावी. चुकीच्या कर आकारणीबाबत मालमाता धारकांची तक्रार असेल तर अर्जासोबत बांधकाम परवान्याची प्रत, बांधकाम नकाशा व पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे. वापराच्या प्रकारामध्ये बदल झाला असल्यास मालमत्ताधारकांनी अर्जासोबत बांधकाम परवाना प्रत, बांधकाम नकाशा व बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जोडावे.व्यवसाय बंद केल्याबाबतचा पुरावा सादर करावा. कर मागणी बिलामध्ये नावात दुरुस्ती करणे असल्यास खरेदीखत, सातबारा किंवा सिटी सर्वे उतारा, विकास कर व हस्तांतरण कर भरणा केल्याची पावती, सन २०२३- २४ मध्ये मालमत्ता कराचा भरणा केलेली पावती व सूचना पत्रकाची प्रत सादर करावी.
नळ जोडणी नसतानाकिंवा नळ जोडणी असून पाणीपट्टी कराचे मागणी बिल जास्तीचे येत असल्यास अशा मालमत्ता धारकांनी पाणीपट्टी कर भरणा केल्याची पावती सादर करावी.अर्जासोबत सादर केलेल्या पुराव्यांची अधिका-यांकडून पडताळणी करुन अर्जावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.त्यामुळे मालमत्ता धारकांनी दिलेल्या तारखेस क्षेत्रीय कार्यालयात आपली कागदपत्रे व अर्ज सादर करावेत. अर्ज सादर न केल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरुन मालमत्ता कराची वसुली सक्तीने करण्यात येईल,असे मनपाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR