33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeनांदेडआयकर विभागाचे धाडसत्र

आयकर विभागाचे धाडसत्र

नांदेड : प्रतिनिधी
शहरात खासगी फायनान्सचे मोठे जाळे चालवणा-या संचालकांच्या कार्यालयावर व घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. एकाच वेळी ५ ते ७ ठिकाणी आयकर विभागाने या धाडी टाकल्या असून त्यासाठी १२५ ते १५० अधिकारी – कर्मचा-यांचा फौजफाटा नांदेडात दाखल झाला आहे. एकाचवेळी झालेल्या या कारवाईमुळे व्यापा-यांमध्ये खळबळ उडाली आहे.

नांदेड शहर व परिसरात खासगी फायनान्स चालवणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यात काही पतसंस्थांबरोबरच खासगी सावकारांचाही समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहे. या प्रकाराची माहिती आयकर विभागाच्या अधिका-यांना प्रारंभीच मिळाली होती. त्यामुळे दि.१० मे रोजी सकाळी ७.३० वा. आयकर विभागाचे अधिकारी – कर्मचा-यांचा मोठा फौजफाटा शिवाजीनगर परिसरातील एका फायनान्स कंपनीच्या संचालकांच्या घरावर धडकला. शहरातील शिवाजीनगरसह अलीभाई टॉवर, कोकाटे कॉम्प्लेक्स येथील फायनान्स कंपनीच्या शाखांवरही त्यांनी धाड टाकली. सद्यस्थितीत भंडारी फायनान्स व आदिनाथ अर्बन को-ऑपरेटीव बँक या पतसंस्थेतील कारभाराची चौकशी सुरू असल्याची माहिती पुढे येत असून आणखी किती पतसंस्था अथवा खासगी सावकारांवर अशी कारवाई सुरू आहे याबाबत गुप्तता पाळली जात आहे.

फायनान्सच्या कार्यालयातील संगणक व त्यातील नोंदी तपासण्याचे काम सकाळपासून सुरू आहे. फायनान्ससह अन्य काही व्यापा-यांचीही चौकशी करण्यात येत असून आयकर विभागाच्या चौकशीच्या फे-यात किती व्यावसायिक अडकले हे लवकरच निष्पन्न होण्याची शक्यता आहे. दरम्यान औरंगाबाद, मुंबई, नाशिक येथील आयकर विभागाचा १२५ ते १५० अधिकारी – कर्मचा-यांचा फौजफाटा एकाचवेळी नांदेडात धडकल्यामुळे अवैधरित्या सावकारी करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR