33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमी असे काही बोललेलो नाही

मी असे काही बोललेलो नाही

शरद पवारांचे प्रादेशिक पक्षांबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

मुंबई : शरद पवार यांच्या प्रादेशिक पक्ष विलीनीकरणाच्या वक्तव्यावरून मोठ्या चर्चेला तोंड फुटले होते. याप्रकरणी शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या जवळ जाणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. स्थापनेपासून आम्ही काम करत आहोत. अनेक वर्षांचा एकत्रित काम करण्याचा आमचा अनुभव आहे. त्यामुळे अधिक एकत्र येऊन काम करण्याची आमची भावना वाढली तर आश्चर्य वाटायला नको, असे ते म्हणाले.

काहीही झालं तरी आम्ही गांधी-नेहरूंचा विचार सोडणार नाही. भाजपसोबत जाणार नाही. आमच्यातील काही सहकारी भाजपसोबत जाण्याच्या विचाराचे होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबाबत मी काहीही बोललेलो नाही. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे, असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसध्ये विलीन करण्याचं मी बोललेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस २००१ पासून आतापर्यंत एकत्र काम करत आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एकत्र होते. मागच्या मंत्रिमंडळात देखील सोबत होते. एकत्र निवडणुका लढल्या. अनेक मतदारसंघांत देखील अनेक ठिकाणी जिथे काँग्रेसचा उमेदवार तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार दिला आणि जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार होता तिथे काँग्रेसचा उमेदवार दिला. एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याने आम्ही एकत्र काम करतोय, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांना जास्त सभा घेण्यासाठी गळ घातली जात आहे. त्यांना त्रास दिला जातोय, त्यांना कोणीही आराम करा असं म्हणत नाही, असे अजित पवार एका सभेमध्ये म्हणाले होते. यावर शरद पवार म्हणाले की, कोणीही मला त्रास दिलेला नाही. ते लोक माझ्यावर प्रेम करतात. प्रेमापोटी आम्ही काम करत आहोत.

तीन टप्प्यातील मतदान पंतप्रधान मोदींना अस्वस्थ करणारं आहे. लोक त्यांच्यापासून दूर जात आहेत. याची जाणीव भाजपला झाली आहे. महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR