29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमतदान करा अन् मोफत मिळवा पोहे-जिलेबी, सिनेमाचं तिकिट

मतदान करा अन् मोफत मिळवा पोहे-जिलेबी, सिनेमाचं तिकिट

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक २०२४ साठीचे आतापर्यंत मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत. आता चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. कडक ऊन आणि उष्णतेची लाट असतानाही मतदार मतदानासाठी बाहेर पडणे हा निवडणूक आयोगासाठी चिंतेचा विषय आहे. तिस-या टप्प्यात सुमारे ६५ टक्के मतदान झाले आहे.

आता केवळ निवडणूक आयोगच नाही तर व्यापारी आणि जिल्हा प्रशासनानेही मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन मोहीम सुरू केली आहे. मतदानासाठी लोकांना मोफत पोहे-जलेबी आणि चित्रपटाच्या तिकिटांवर बंपर सवलत दिली जात आहे. मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करण्यावर भरघोस सवलतींसोबतच अनेक शहरांमध्ये अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

मतदानाच्या पहिल्या तीन टप्प्यांनंतर आता पुढील टप्प्यांसाठी १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार तीन टप्प्यांत अपेक्षेप्रमाणे मतदान झाले नाही. पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के, दुस-या टप्प्यात ६६.७१ टक्के आणि तिस-या टप्प्यात ६५.६८ टक्के मतदान झाले आहे. विविध राजकीय पक्ष, नेते यांनी आवाहन करूनही मतदानाबाबत लोकांची उदासीन वृत्ती कायम आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासनासह स्थानिक व्यावसायिकांनीही लोकांना जागरूक करण्यासाठी आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाने तयारी केली आहे. येथे सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे. लोकांना मतदानासाठी वेळ देण्यासाठी दिल्लीच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने शहरात सशुल्क सुटी जाहीर केली आहे. या आदेशानुसार, दिल्लीतील सर्व पात्र कर्मचा-यांना मग ते सरकारी असोत वा खासगी, त्यांना मतदानासाठी पगारी रजा मिळेल.

मुंबईतील मेट्रो प्रशासनाची खास ऑफर
मुंबईत २० मे रोजी लोकसभेच्या अनेक जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या प्रयत्नात मेट्रो प्रशासनाने मतदानाच्या दिवशी काही मार्गावरील प्रवाशांना १० टक्के विशेष सवलत देऊ केली आहे.

पोहे-जिलेबी फुकट
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करणा-यांना तीन दिवस मोफत प्रवास करण्याचे आश्वासन येथील बसचालकांनी दिले आहे. याशिवाय टी-शर्ट आणि कॅपसाठीही मतदान केंद्रांवर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. इंदूरमधील व्यापारी संघटनांनी मतदारांना शाईचे बोट दाखवल्यावर पोहे आणि जिलेबीचा नाश्ता मोफत देण्याची घोषणा केली आहे.

गुरुग्राममध्ये चित्रपटाच्या तिकिटांवर मोठी सूट
गुरुग्राममध्ये २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत गुरुग्राम जिल्हा प्रशासनाने मल्टिप्लेक्सच्या सहकार्याने लोकांसाठी खास ऑफर आणली आहे. मतदारांना चित्रपटाची तिकिटे आणि मल्टिप्लेक्समध्ये उपलब्ध असलेल्या स्नॅक्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तुमच्या बोटावर मतदानाची शाई असणे आवश्यक आहे, अशी अट आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR