ठाणे : प्रतिनिधी
अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी शिक्षण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ही अंतिम मुदत देण्यात आली होती. तरीही मराठी न शिकणा-या मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी (१७ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधताना इशारा दिला आहे. ‘त्यांना नोटीस देऊन ३० दिवसांची मुदत देऊन कारवाई करण्यात येईल. मुदत देऊनही मराठी बोलता आली नाही तर आधी लायसन्स त्यानंतर परमिट रद्द करण्याचा इशारही त्यांनी यावेळी दिला आहे.
ठाण्यात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘महाराष्ट्रात मराठी परीक्षेत ७,७५० ऑटो-टॅक्सी चालक नापास झाले आहेत. या रिक्षाचालकांना वेळ वाढवून संधी देण्यासाठी सरकार विचार करणार आहे. राज्यातील १९८९ मधील नियमानुसार रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठीत संवाद साधा असे नमूद केले आहे. पण, गेल्या अनेक वर्षापासून अनेक रिक्षाचालकांना मराठी बोलताच येत नाही. व्यावहारिक ज्ञान मराठी असणं आवश्यक आहे. त्यावरून वादविवाद मोठ्या प्रमाणावर होत होते. म्हणून आम्ही एक मोहीम राबवली. रिक्षाचालकांना मराठी शिकवण्याचा ठरवले, त्यासाठी रिक्षाचालकांच्या संघटनांनी तीन महिन्याची मुदत मागितली आणि आम्ही ती दिली.
रिक्षाचालकांनी १६ ते १७ वाक्य शिकले तरी वाद होणार नाही. आमच्या या मोहिमेत साहित्यिकही आले. त्यांनीही रिक्षा चालकांचे वर्ग घेतले. जवळ जवळ १,६५,००० रिक्षा, टॅक्सी चालकांनी आमच्याकडे नोंदणी केली होती. त्यात १ लाख ४० हजार रिक्षाचालक उत्तीर्ण झाले. त्यांना प्रमाणापत्र देण्यात आले. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
















