मुरुड : वार्ताहर
मुरुड येथे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. मांजरा आणि धनेगाव धरणातून येणारे अशुद्ध पाणी मुरुड येथील जलशुद्धी केंद्रात शुद्ध न करता पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची तक्रार भीम क्रांती संघ या सामाजिक संघटनेच्यावतीने लातूर येथील कार्यकारी अभियंता आणि मुरुड ग्रामपंचायतचे सरपंच यांना निवेदनाद्वारे केली आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर सुरू करून पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुरुड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर प्रणाली स्थापन झाल्यापासून ती बंद असून सध्या पंपहाऊसमधून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट अशुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी जिल्हा परिषद कन्या शाळेची जागा हस्तांतरीत करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, लातूर यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी केली. या योजनेचा मुख्य उद्देश मांजरा व धनेगाव धरणातून येणारे अशुद्ध पाणी शुद्ध करून मुरुड ग्रामस्थांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा होता परंतु दुर्दैवाने आजपर्यंत या केंद्रातून एकदाही शुद्ध पाण्याचा पुरवठा झालेला नाही.
या संदर्भात भीम क्रांती संघाच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, लातूर येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावर संबंधित अधिका-यांनी लेखी स्वरूपात कळविले आहे की, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सर्व कामे पूर्ण झाली असून जलशुद्धीकरण केंद्र दि २० नोव्हेंबर २०२३ रोजी ग्रामपंचायत मुरुड यांच्या ताब्यात हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे सदर केंद्र चालविण्याची व देखभालीची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत मुरुड यांची आहे. सध्या अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांना पोटाचे विकार, जुलाब, कावीळ, टायफॉईड तसेच इतर जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे तसेच जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली असून हौदामध्ये साप, बेडूक व इतर घातक प्राणी आढळून येत आहेत. यामुळे केंद्राची नियमित देखभाल होत नसल्याचे स्पष्ट दिसून येते.
तेव्हा जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर प्रणाली तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी. मांजरा व धनेगाव धरणातून येणारे पाणी शुद्ध करूनच नागरिकांना पुरवठा करण्यात यावा. जलशुद्धीकरण केंद्र परिसराची तातडीने स्वच्छता करून आवश्यक दुरुस्ती व देखभाल करण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यात यावा आपण या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत माहितीस्तव, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती लातूर यांना देण्यात येणार आहे. या निवेदनावर भीम क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप राजाराम सुरवसे, काकासाहेब मस्के मुरुड शहर उपाध्यक्ष, शाहीन सय्यद जिल्हा महासचिव लातूर यांच्या स्वाक्ष-या आहेत.
















