30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी सरकार हे गझनी सरकार; गायीवर बोलता तसे महागाईवर बोला - उद्धव ठाकरे

मोदी सरकार हे गझनी सरकार; गायीवर बोलता तसे महागाईवर बोला – उद्धव ठाकरे

कोल्हापूर : गेल्या लोकसभा निवडणुकीला कोल्हापुरातून उमेदवार निवडून दिले होते. आता ते गद्दार झाले आहेत. त्या गद्दारांचा सूड घ्यायला कोल्हापुरात आलो आहे, अशी टीका करून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी हा सूड घ्यायला कोल्हापूरकरांनी मदत करावी, असे म्हणत संजय मंडलिक व धैर्यशील माने या खासदारांचे नाव न घेता कोल्हापुरातील सभेत टीका केली. ही सभा येथील उभा मारुती चौकातील गांधी मैदान येथे झाली. सभेला अक्षरश: तुडुंब गर्दी होती. समोर असलेल्या अथांग जनसागराचे रूपांतर मतदानात झाले तर छत्रपती शाहू महाराज यांचा विजय निश्चित होईल.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नथल्ला, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भव्य जाहीर सभा रात्री गांधी मैदानात पार पडली त्यावेळी शरद पवारांनी मोदींना महाराष्ट्र तुम्हाला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा दिला.

कोल्हापूरमध्ये मोदींची सभा पार पडली. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी कोल्हापूर दौ-यावर होते. त्यानंतर मोदींनी आणि भाजपाने कोल्हापूरच्या गादीचा मान ठेवायला हवा होता अशी चर्चा रंगली. त्यावरून विरोधकांनीही त्यांना लक्ष्य केले. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी साता-याची गादी महत्त्वाची नाही का? असा सवाल विरोधकांना केला आहे. आज शरद पवार यांनी भाषणात मोदींना कोल्हापूरमधून थेट इशाराच दिला आहे.

ज्या वक्तव्याची चर्चा रंगली आह.े कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आज शिव शाहू निर्धार सभा आयोजित करण्यात आली. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरेंसह काँग्रेसमधील बडे नेतेही कोल्हापुरात उपस्थित होते. मोदींनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात सभा घेतली. त्यानंतर, आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सभा घेऊन शाहू महाराजांना निवडून देण्याचे आवाहन कोल्हापूरकरांना केले आहे. १ मे अर्थात महाराष्ट्र दिन असल्याने शरद पवारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास सांगत भाषणाला सुरुवात केली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सुरतमधील दोघेजण देश चालवत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले आहेत. इलॉन मस्क हे हुशार निघाले. त्यांचा उद्योग गुजरातमध्ये पळवण्याचा डाव होता. मात्र लोकसभा निवडणूक होईपर्यंत ते थांबले आहेत. त्यांनाही माहीत झाले आहे की लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे सरकार जाणार आणि इंडिया आघाडीचे सरकार येणार. नवे सरकार आले की आम्ही उद्योजकांना चांगल्या सुविधा पुरवू. जीएसटीच्या दहशतवादातून उद्योगाला मुक्त केले जाईल. उद्योगाची परिपूर्ण वाढ होण्यासाठी नवे सरकार कटिबद्ध असेल. या देशात आणि राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. मोदींचे सरकार आणि मिंदे सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. याच शेतक-यांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार निश्चितपणे करून दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ठाकरे म्हणाले, शिवसेनेने भाजपला खांद्यावर घेऊन महाराष्ट्र दाखविला.

अन्यथा त्यांना खांदा द्यायला कोणी मिळाले नसते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पाडापाडीचे राजकारण केले. त्याचा सूड घेण्यासाठी मी आलो आहे. संघर्ष करीत मुंबई घेतली. पण भाजप मुंबईचे महत्त्व कमी करीत आहे. सर्व उद्योग व गद्दारही गुजरातला गेले. सध्या मोदी नाही तर गझनी सरकार आहे. त्यांना काल काय केले ते आज आठवत नाही. सध्या ते भटकती आत्मा काढत आहेत. त्यांनी त्याचा गुजरातमध्ये शोध घ्यावा. एकीकडे शेतक-यांवर प्रेम असल्याचा आव आणला जातो, आणि दुसरीकडे शेतक-यांच्या विरोधात काळे कायदे का आणले होते. याविरोधातील आंदोलनात अनेक शेतक-यांचे बळी गेले. भटकती आत्मा शोधण्यापेक्षा त्या शेतक-यांच्या आत्म्यांना काय वाटत असेल, याचा विचार करावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR