30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरदिग्गज नेत्यांमध्ये राजकीय समतोल साधण्याचे शिंदेंसमोर आव्हान

दिग्गज नेत्यांमध्ये राजकीय समतोल साधण्याचे शिंदेंसमोर आव्हान

सोलापूर : रणजित जोशी
सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे विरुध्द राम सातपुते असा तगडा सामना सुरू आहे. या सामन्यात शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांची भूमिका महत्त्वाची असून पद्मशाली समाजासह अन्य समाजात चांगले वजन असलेल्या महेश कोठे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मात्र विधानसभेची समीकरणे डोळ्यांसमोर ठेवून कोठे पावले उचलत आहेत.कोठेंची नजर शहर उत्तर व शहर मध्य मतदारसंघांवर आहे.

दक्षिण सोलापूर मतदारसंघात दिलीप माने यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने समीकरणे बदलली आहेत. लोकसभा निवडणूक लागली आहे. काँग्रेस पक्षाकडून सोलापूर लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यातच शिंदे पिता-पुत्रींनी माजी आ. नरसय्या आडम यांना शहर मध्यची जागा सोडण्याचा शब्द दिला आहे. तसेच माजी आ. दिलीप माने पुन्हा काँग्रेस पक्षात आल्यामुळे महेश कोठे, बाबा मिस्त्री आदी नेते अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे.

दक्षिण विधानसभेसाठी काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके आदी नेते इच्छुक आहेत, तर शहर मध्य विधानसभेसाठी शरदचंद्र पवार गटाचे नेते महेश कोठे, काँग्रेस पक्षातील अनेक नेते हे इच्छुक आहेत. त्या नेत्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आडम मास्तरांची जवळपास दीड लाख मते आहेत. ही मते हवी असतील तर शहर मध्य विधानसभेची जागा माकप पक्षाला सोडावी, अशी मागणी आडम मास्तर यांनी केली होती. त्यावेळी शिंदे पिता-पुत्रींनी वरिष्ठ नेत्यांशी बोलून जागेचा निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. त्यामुळे मास्तर महाविकास आघाडीसोबत आले आहेत, तर महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार गटाचे नेते महेश कोठे नाराज झाले आहेत.

ते शहर मध्य विधानसभेसाठी इच्छुक होते, मात्र तेथे आडम मास्तर यांना शब्द दिल्यामुळे कोठे अस्वस्थ झाले आहेत. ते प्रचारात सक्रिय दिसत नसल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.त्यातच माजी आमदार माने यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे दक्षिणमधून विधानसभेच्या इच्छुकांनी सध्याच्या प्रचारातून अंग काढून घेतल्याचे चित्र दिसत आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे
महेश कोठे हे शहर मध्य विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. कोठे यांचे शहर मध्य, शहर उत्तर विधानसभेत चांगले वजन आहे.

त्यामुळे येणा-या विधानसभा निवडणुकीत ते शहर उत्तरमध्ये आ. विजयकुमार देशमुख यांना मदत करून शहर मध्य विधानसभेसाठी भाजपकडून मदत घेणार असल्याची चर्चाही जोर धरू लागली आहे, मात्र भाजपकडून वरिष्ठ पक्षश्रेष्ठींना बोलून निर्णय घेऊ, अशा आश्वासनाची चर्चा आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेसाठी नरसय्या आडम मास्तरांशी शहर मध्यमध्ये आणि दक्षिण सोलापूरमध्ये दिलीप मानेंशी बेरीज केल्याने अन्य नेते नाराज आहेत, त्यांची समजूत शिंदे कशी काढतात यावर प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य अवलंबून राहील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR