23.4 C
Latur
Tuesday, February 24, 2026
Homeलातूररब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान

रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावांतील फळबागा आणि रब्बी हंगामातील पिके आडवी झाली असून शेतक-यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.
तालुक्यातील आंबा तसेच इतर फळ बागांना मोठा फटका बसला आहे. वा-याच्या वेगामुळे झाडांवरील फळे मोठ्या प्रमाणावर गळून पडली, तर काही ठिकाणी फांद्या मोडून पडल्याचे चित्र दिसून आले. फुलो-यात असलेल्या आंबा बागांवर पावसाचा विपरीत परिणाम झाला असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. फळबागांमध्ये पाणी साठल्याने रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके पावसामुळे आडवी पडली असून हरभ-याच्या शेंगा ओलाव्यामुळे काळवंडण्याची शक्यता आहे. काही भागात गव्हाचे कणसे पाण्यामुळे भिजून गुणवत्ता घसरू शकते, अशी भीती शेतक-यांनी व्यक्त केली आहे. तालुक्यातील अनेक शेतक-यांनी पीककर्ज व खाजगी कर्ज काढून शेती केली होती. ऐन उत्पन्नाच्या काळातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आधीच बाजारभावातील अनिश्चीतता आणि उत्पादन खर्च वाढलेला असताना या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR