मुंबई : प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसासंदर्भात हवामान विभागाने एक महत्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस काहीशी विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे. तर ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये पाऊस ब्रेक घेणार असून, त्यानंतर (१६ ऑगस्टनंतर) राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. तर ‘एल निनो’चा प्रभाव वाढण्याची शक्यता असून ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत देशात सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने त्या अनुषंगाने पावले उचलणे गरजेचे आहे.
जुलै महिन्याच्या शेवटी मुसळधार पावसाने राज्यभरात एकच कहर केल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. अनेक भागात नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. तर बहुतांश धरणांनी मर्यादा पातळी ओलांडली आहे.
नैऋत्य मान्सूनच्या दुस-या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) देशभरात सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केले आहे. तर १५ ऑगस्टपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश व विदर्भात पावसाचा जोर कमी राहील. या काळात बहुतांश ठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. १५ ऑगस्टनंतर मात्र राज्यभरात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले. सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरावर ‘मध्यम एल निनो’ परिस्थिती असून, मान्सूनच्या उर्वरित काळात ती अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसावर प्रतिकूल परिणाम दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.
भात शेतीची लागवड अंतिम टप्प्यात
तळकोकणात भात शेतीची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. गेले काही दिवस समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने बळिराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग दिला असून कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
लातूर जिल्ह्याला तीन दिवसांच्या पावसाने खरिपाला दिलासा; मात्र प्रकल्प अद्याप तहानलेलेच
गेल्या तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर, लातूर ग्रामीण, औसा, निलंगा आदी तालुक्यांमध्ये पावसामुळे रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून पेरणी झालेल्या पिकांची वाढही जोमाने होत आहे.
मात्र, हा पाऊस पिकांसाठी लाभदायक ठरला असला तरी जलसाठ्याच्या दृष्टीने अद्याप समाधानकारक ठरलेला नाही. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्प आणि १३५ लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १३.६९ टक्के पाणीसाठा असून, मागील दोन दिवसांच्या पावसामुळे प्रकल्पांच्या साठ्यात विशेष वाढ झालेली नाही. त्यामुळे धरणे आणि प्रकल्प अद्यापही तहानलेलेच असून, आगामी काळात दमदार पावसाची गरज कायम आहे.
















