परभणी : शहरातील क्वीन्स इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी यासीन मुजफ्फर खान याने भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
नेपाळ येथे आयोजित ११व्या विंडो आंतरराष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाच्या अंडर-१५ गटातून खेळत त्याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले. यासीन खानच्या या यशामुळे जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.
त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे भारतीय संघाने स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली. या यशाबद्दल परभणी क्वीन्स इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका सय्यद अर्शिया, फुटबॉल कोच सय्यद शकील, शिक्षक, विद्यार्थ्यांसह क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले. यासीनच्या यशामागे त्याचे कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्याच्या कामगिरीमुळे जिल्ह्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून भविष्यातही तो भारतीय फुटबॉलमध्ये मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
















