मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकरी प्रश्न, महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवरून ‘गँगस् ऑफ ट्रिपल इंजिन’ म्हणत राज्य सरकारसह भाजपवर जोरदार टीका केली.
एल निनोमुळे दुष्काळ पडणार याचा अंदाज आधीच होता. तरीही सरकारने कोणतीही पूर्वतयारी केली नाही, असा आरोप त्यांनी केला. राज्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट आहे. हे सरकारच बोगस आहे. कर्जमाफीच्या नावाखाली प्राप्तिकर विभागाची यादी मागवून वेळकाढूपणा केला जात आहे. सरकारमधील एका मंर्त्यानेच ही यादी उशिरा पाठवण्याचे निर्देश दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे, असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला.
राज्यातील सत्तेच्या समतोलावर भाष्य करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्तेतील राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात मोठी धुसफूस सुरू आहे. हे ट्रिपल इंजिन सरकार नसून ‘गँग ऑफ ट्रिपल इंजिन’ आहे आणि आता त्यांच्यात टोळीयुद्ध सुरू झाले आहे. अजित पवार गटात सर्व काही आलबेल नसून लवकरच हा पक्ष फुटल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल, असा दावाही त्यांनी केला.
सध्या देशभरात राम मंदिर उभारणीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. यावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, हा केवळ एका कोषाध्यक्षाचा घोटाळा नसून संपूर्ण विश्वस्त मंडळाचा यात सहभाग आहे. आधी अभिमानाने सांगायचे की विश्वस्त मंडळात संघाचे लोक आहेत. आता थेट राम मंदिरावर ‘दरोडा’ पडल्यानंतर संघ केवळ नाराजी व्यक्त करत आहे, हे हास्यास्पद आहे. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हिंमत असेल, तर त्यांनी या प्रकरणातील सर्व संबंधितांना तत्काळ निष्कासित करून दाखवावे.
शरद पवारांच्या एनडीए प्रवेशाचे खंडन
शरद पवार एनडीएमध्ये जाणार या केवळ वावड्या असून, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी या चर्चांचे स्पष्टपणे खंडन करत शरद पवार एनडीएमध्ये प्रवेश करणार नसून या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले असल्याचे सपकाळ म्हणाले.
मुंबईतील विकासकामे आणि स्मारके
मुंबईला चारही बाजूंनी प्रवेशद्वार बनवण्याची सरकारची घोषणा ही केवळ स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी केलेली धूळफेक आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अद्याप पूर्ण झालेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राहुल गांधींच्या भूमिकेचे समर्थन
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा दिल्याबाबत विचारले असता सपकाळ म्हणाले की, काँग्रेस आधीपासूनच बेरोजगारी, नीट परीक्षा, यूपीएससी आणि विविध लोकसेवा आयोगांमधील कथित गैरव्यवहारांच्या विरोधात आंदोलन करत आहे. ‘छात्रों की गूंज’सारख्या अभियानातून काँग्रेस युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले.
















