35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रलग्नसराई संपताच सोने स्वस्त

लग्नसराई संपताच सोने स्वस्त

मुंबई : ऐन लग्नसराईत उच्चांकी दरवाढ नोंदविलेल्या सोन्याच्या दरात लग्नसराई संपताच काहीशी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर घडलेल्या घटनांचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला असून सोने आता ७२ हजारांवर आले आहे. पुढील लग्नाचे मुहूर्त जुलैमध्ये असल्याने सोने खरेदी करू इच्छिणा-या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

तब्बल ७४ हजारांपर्यंत मजल मारलेल्या सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सोन्याचे दर वाढल्याचे बोलले जात होते.

आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदी आणि आखाती देशातील युद्धाच्या सावटामुळे सोन्याचे दर सातत्याने कमी होत असून २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ७२ हजारांवर आले आहे. पुढील काळातही ही घसरण कायम राहण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये सोने दरात थेट चार हजाराची घसरण झाली आहे. रविवारी सोन्याचा दर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ७१ हजार ८६० रुपये इतका नोंदविला गेला; तर २२ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ६५ हजार ८८० रुपये दराची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यांपूर्वी सोन्याचा दर ६४ ते ६५ हजार रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. मात्र काही दिवसांमध्ये त्याच्यात तब्बल १० हजारांनी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागली.

चांदीत दीड हजारांची घसरण
गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरातही घसरण होत आहे. मागील दहा दिवसांपूर्वी म्हणजेच २६ एप्रिल रोजी चांदीचा दर प्रतिकिलोसाठी ८४ हजार ५०० रुपये इतका नोंदविला गेला. रविवारी चांदीचा दर ८३ हजार रुपये इतका नोंदविला गेला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR