30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रनसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समितीचा राजीनामा घेतला मागे

नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समितीचा राजीनामा घेतला मागे

मुंबईत काँग्रेसला वर्षा गायकवाड यांना दिलासा

मुंबई : काँग्रेस पक्षाला मुंबईमध्ये मोठे यश मिळाले आहे. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेणारे नसीम खान आता प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. नसीम खान यांनी प्रचार समितीचा राजीनामा देखील दिला होता. मात्र, आता आपण राजीनामा मागे घेत असल्याचे नसीम खान यांनी जाहीर केले आहे. यामुळे काँग्रेस तसेच वर्षा गायकवाड यांना देखील हा मोठा दिलासा मानला जात आहे.

कोणताही प्रकारचा गैरसमज नको, तसेच नसीम खान पदासाठी काम करत नाही तर नसीब खान काँग्रेसच्या विचारधारेसाठी काम करतो. आम्ही गांधी, नेहरू परिवाराच्या नेतृत्वाखाली काम करतो, ही माझी कायम भूमिका राहिली आहे. त्यामुळे प्रचार समितीचा राजीनामा मी मागे घेत असल्याचे काँग्रेस नेते नसीम खान यांनी स्पष्ट केले. मुंबई मधून उमेदवारीसाठी आग्रही असलेले नसीम खान यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नसीम खान नाराज होते, असे बोलले जात होते. काँग्रेसने राज्यात एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही, त्यामुळे समाजाची नाराजीचा विचार करून मी राजीनामा देत असल्याचे नसीम खान यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता त्यांनी आपण प्रचार समितीचा राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.

काँग्रेस कमिटीत एकही नेता नाराज नाही
वर्षा गायकवाड यांना काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते विरोध करत असल्याचा आरोप चुकीचा आहे. हा विरोधकांचा चुकीचा प्रचार असल्याचे नसीम खान यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत एकही नेता नाराज नाही. भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे या सर्वांनी माझी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वांनी एकत्र बसून चर्चा केली आणि त्याच दिवशी प्रचार समितीचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता समाजाची भावना पक्ष श्रेष्ठीपर्यंत पोहोचली आहे. त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात येणार असल्याचे ठरले आहे. असेही नसीम खान यांनी म्हटले आहे.

उज्वल निकम यांच्याशी वर्षा गायकवाड यांची लढत
काँग्रेसच्या वतीने मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांना अंतर्गत विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे अनेक बडे नेते वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी अद्याप पुढे आलेले नाही. मात्र, आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबतची दखल घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. नसीम खान यांनी देखील आता प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतला आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. मुंबईत वर्षा गायकवाड यांची थेट लढत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उज्वल निकम यांच्याशी होत आहे. त्यामुळे आता ही लढत महत्त्वाची मानली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR